ऑस्ट्रेलियाचा संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ हा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पण तसे असले तरी नुकतेच इंग्लंडला स्कॉटलंडच्या संघाने पराभूत केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका तुलनेने सोपी जाणार, अशी अपेक्षा असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट याने संघाला एक धोक्याचा इशारा दिला आहे.

गिलख्रिस्ट हा एक दिग्गज माजी क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियायच्या संघात चपळ यष्टीरक्षक आणि एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याने आपली भूमिका चोख बजावली होती. अशा या क्रिकेपटूने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पुढील संपूर्ण वर्ष संघासाठी खडतर जाणार असल्याचे म्हटत संघातील खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला आहे.

चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू दोषी आढळले होते. त्यामुळे संघावर आणि खेळाडूंवर प्रचंड टीका झाली. तशातच, तत्कालीन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता पुढील वर्ष हे या संघासाठी अडथळ्यांचे असणार आहे, असे गिलख्रिस्ट म्हणाला.

ऑस्ट्रेलिया आता जेव्हा मैदानावर उतरणार आहे, त्यावेळी त्यांच्यावर प्रत्येक क्रिकेटप्रेमींचे बारीक लक्ष असेल. त्यांच्या साठी ही विश्वास कमावणायची एक कसोटी असेल. त्यामुळे त्यांना पावलापावलावर अडथळे येतील. पण त्यांनी त्याचा धीराने सामना करावा, असेही गिलख्रिस्टने सुचवले आहे.