अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ डाव आणि ४८ धावांनी बाजी मारली. पहिल्या डावात ५८९ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिला डाव ३०२ धावांवर संपवला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन देत, ऑस्ट्रेलियाने पाकचा दुसरा डावही २३९ धावांवर संपवत मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं.

सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नरने आपली अ‍ॅशेस मालिकेतली खराब कामगिरी बाजूला ठेवत दमदार पुनरागमन केलं. पहिल्या डावात वॉर्नरने नाबाद त्रिशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. त्याने नाबाद ३३५ धावांची खेळी केली, त्याला मार्नस लाबुशेनने १६२ धावा करत भक्कम साथ दिली. पहिल्या डावात शाहिन आफ्रिदीचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला यश मिळालं नाही.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची पहिल्या डावात चांगलीच घरसगुंडी उडाली. मधल्या फळीत बाबर आझमच्या ९७ धावा आणि अखेरच्या फळीत फिरकीपटू यासीर शाहाने झळकावलेलं शतक या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३०२ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने ६ बळी घेत पाकच्या संघाचं कंबरडं मोडलं. कर्णधार टीम पेनने पाकिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या डावातही पाकची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शान मसूद आणि मधल्या फळीत असद शफीकने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. २३९ धावांवर पाकिस्तानचा दुसरा डाव संपूष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने १ डाव ४८ धावांनी सामन्यात बाजी मारली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनने ५ तर जोश हेजलवूडने ३ बळी घेतले.

अवश्य वाचा – Aus vs Pak : पॅट कमिन्सची धडाकेबाज कामगिरी, झळकावलं अर्धशतक