पी.व्ही.सिंधूपाठोपाठ भारताच्या सायना नेहवालनेही ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना जागतिक क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या सोनिया चेहसोबत होता. त्यामुळे हा सामना सायना सहज जिंकेल असा अंदाज सर्वांनी बांधला होता.

मात्र पहिल्याच सेटच्या सुरुवातीला मलेशियाच्या सोनियाने २-१ अशी आघाडी घेत सायनाला धक्का दिला. मात्र यामधून लगेच सावरत सायनाने सेटमध्ये ६-३ अशी आघाडी घेतली. पहिल्या सेटच्या अखेरपर्यंत सायनाने आपल्या आघाडीमध्ये १८-८ अशी वाढ केली. सायनाच्या झंजावातासमोर टिकाव धरण सोनियाला केवळ अशक्य दिसत होतं. मात्र शेवटच्या क्षणी सोनियाने पुन्हा सायनाला धक्का देत तब्बल ६ मॅच पॉईंट वाचवले. त्यामुळे सायना पहिला सेट गमावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सायनाने आपला सगळा अनुभव पणाला लावत पहिला सेट आपल्या खिशात घातला.

अखेरच्या क्षणांमध्ये सोनियाने सायनाला दिलेली टक्कर पाहता दुसरा सेट चुरशीचा होणार यात शंकाच नव्हती. त्याचप्रमाणे सायनाला टक्कर देत मलेशियाच्या सोनियाने ३-१ वरुन ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर सेटमध्ये आघाडी घेण्याचे सायना नेहवालचे प्रत्येक प्रयत्न सोनियाने हाणून पाडले. १२-१२ या बरोबरीनंतर सोनियाने सायना धक्का देत दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली. प्रतिस्पर्धी खेळाडूकडून अचानक झालेला हल्ला पाहता सायनाने सोनियाला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अटीतटीच्या लढतीत सोनियाने दुसरा सेट २२-२० अशा फरकाने खिशात घातला.

मात्र तिसऱ्या सेटमध्ये सायना नेहवालने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. तिसऱ्या सेटमध्येही सोनियाने काही चांगले फटके खेळत सायनाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला मात्र सायनाने सोनियाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. काही क्षणांनंतर सायनाने सामन्यात ६ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. अखेरच्या क्षणापर्यंत सायनाने ही आघाडी कायम ठेवत तिसरा सेट २१-१४ अशा फरकाने खिशात घातला. सायना नेहवालच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारतीय खेळाडूंचा विजयरथ अविरत सुरु आहे. सध्या भारताचे सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, किदम्बी श्रीकांत, साई प्रणीत हे खेळाडू उपांत्य पूर्व फेरीत दाखल झाले आहेत.