सानिया मिर्झा आणि रोमानियाच्या होरिआ टेकाऊ जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. एक तास आणि १३ मिनिटांच्या लढतीत सानिया-टेकाऊ जोडीने ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गाजडोसोव्हा आणि मॅथ्यू इबडेन जोडीवर २-६, ६-३, १०-२ असा विजय मिळवला. अटीतटीच्या मुकाबल्यात पहिल्या सेटमध्ये जर्मिला-मॅथ्यू जोडीने जबरदस्त सव्‍‌र्हिसच्या जोरावर सानिया-टेकाऊ जोडीला निष्प्रभ केले. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-टेकाऊ जोडीने आपली सव्‍‌र्हिस वाचवण्याकडे भर दिला आणि योग्य वेळी ब्रेकपॉइंट्स मिळवला. प्रतिस्पर्धी जोडीच्या हातून झालेल्या ९ टाळत्या येण्यासारख्या चुकांचा सानिया-टेकाऊने फायदा उठवत दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये एकही चूक न करता आपला खेळ उंचावत सानिया-टेकाऊ जोडीने तिसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
अंतिम लढतीत सानिया-टेकाऊ जोडीची लढत जि झेंग-स्कॉट लिप्स्की आणि क्रिस्तिना म्लाडेनोव्हिक-डॅनियल नेस्टर यांच्यातील विजेत्या जोडीशी होणार आहे. सानिया-टेकाऊ जोडीने मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावल्यास भारतासाठी या प्रकारातले हे दुसरे जेतेपद असणार आहे. सानियाने याच स्पर्धेत २००९मध्ये महेश भूपतीच्या साथीने जेतेपद पटकावले होते.