आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने फक्त भारतालाच हादरा बसलेला नाही, तर क्रिकेटविश्वातील बऱ्याच देशांनी या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगानेही या प्रकरणावर भाष्य केले असून भारतीय क्रिकेटच्या पदरी आयपीएलमुळे फक्त अपप्रतिष्ठाच आली असे त्यांनी म्हटले आहे.
‘‘आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ आणि सट्टेबाजी प्रकरणाचे मला आश्चर्य वाटत नाही. हे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच होत आले आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सट्टेबाजी, फिक्सिंग, अल्कोहल, ड्रग्ज यासह अन्य प्रकरणेही पुढे आली होती. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटच्या पदरी काहीही पडलेले नाही. भारतीय क्रिकेटची एवढी बदनामी यापूर्वी क्रिकेटविश्वात कधीही झालेली नव्हती,’’ असे रणतुंगा यांनी सांगितले आहे.
पैशांच्या मोहापायी काही माजी महान खेळाडू या स्पर्धेला पाठीशी घालत असल्याचे पाहून वेदना होत असल्याचे रणतुंगा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘‘आयपीएलमधून काही महान खेळाडूंना चांगले पैसे मिळतात आणि त्यासाठीच ते या स्पर्धेला पाठीशी घालताना दिसतात. हे चित्र पाहून फार वेदना होतात, इरापल्ली प्रसन्नासारखे काही मोजकेच खेळाडू यावर टीका करताना दिसतात.’’
ते म्हणाले की, ‘‘आयपीएलने क्रिकेटपटूंना लोभी बनवलेले आहे. प्रत्येकाला आयपीएल खेळायचे आहे आणि त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते. या स्पर्धाची गरज काय, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटला काय मिळाले, मला तरी आयपीएलमधून विश्वविख्यात खेळाडू दिल्याचे स्मरणात नाही. भारताचे स्थानिक क्रिकेटनेच विश्वविख्यात खेळाडू दिलेले आहेत.’’