मुशफिकुर रहीमची १५० चेंडूत १४४ धावांची संयमी खेळी आणि गोलंदाजांचा भेदक मारा या एकत्रित कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेला नमवण्याची किमया केली. बांगलादेशने मुशफिकुर रहीमचे शतक व मोहम्मद मिथुनच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर २६१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेला फक्त १२४ धावाच करता आल्या. मुशफिकुर रहीमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पारंपरिक फटक्यांऐवजी आत्मघातकी फटके खेळण्यावर भर दिल्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. उपुल थरंगाने  सर्वाधिक २७ धावा केल्या. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (१६) आणि थिसारा परेरा (६) झटपट बाद झाल्याने श्रीलंकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. बांगलादेशतर्फे मशरफे मोर्तजा, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले तर रुबेल हुसेन, मोसाद्देक हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.