महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याच्या निर्णयावर शंका व्यक्त होण्यास सुरूवात झाली आहे. धोनीवर कर्णधार पदावरून पायउतार होण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा थेट आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे (बीसीए) सचिव आदित्य वर्मा यांनी केला आहे. आदित्य वर्मा यांनी ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या झारखंड विरुद्ध गुजरात रणजीच्या उपांत्यफेरीत झारखंडकडून खेळण्यासाठी धोनीने नकार दिल्याने झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सध्याचे बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी नाराज झाले होते. अमिताभ चौधरी २ जानेवारीपर्यंत झारखंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. धोनीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी नकार दिला होता. मात्र, धोनी झारखंडच्या संघाचा मेन्टॉर म्हणून उपांत्यफेरीच्या सामन्यावेळी संघासोबत उपस्थित होता.

आदित्य वर्मा यांच्या म्हणण्यानुसार धोनीच्या नकारामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. यात धोनीच्या संघातील भविष्याबाबत चर्चा करण्यात आली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एमएसके प्रसाद यांनी धोनीशी याबाबत विचारणा केली. अशाप्रकारे धोनीची इच्छा नसतानाही त्याला कर्णधारपदावरून पायउतार होण्यासाठीचा दबाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप आदित्य वर्मा यांनी केला आहे.

वाचा: धोनीच्या नेतृत्वाखाली अखेरचा सामना

 

वर्मा म्हणाले की, झारखंडला गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभवालासामोरे जावे लागल्याने अमिताभ चौधरी नाराज झाले होते. त्यात धोनीनेही या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. मग चौधरी यांनी एमएसके प्रसाद यांच्याशी धोनीच्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. चौधरी यांच्या अशा प्रयत्नांमुळे धोनी दुखावला गेला आणि त्याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला.

वाचा: धोनीने मला संधी दिली, संघातून बाहेर होण्यापासून अनेकदा वाचवले- विराट कोहली

अमिताभ चौधरी जेव्हा याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया देतील तेव्हा यामागचे सत्य पुढे येऊ शकेल. विशेष म्हणजे, धोनीने देखील आपला निर्णय माध्यमांसमोर येऊन न देता बीसीसीआयला केवळ पत्राद्वारे कळवला. निवड समितीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयने धोनीच्या निर्णयाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. धोनी अद्याप आपल्या निर्णयावर जाहीररित्या बोललेला नाही. बीसीसीआयने ४ जानेवारी रोजी धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते.