‘आयपीएल’च्या शीर्षक प्रायोजकासाठी ‘बीसीसीआय’पुढे अनेक पर्याय

नवी दिल्ली : विवोने माघार घेतल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामासाठी नव्या शीर्षक प्रायोजकाच्या शोधात आहे. त्यासाठी ‘बीसीसीआय’पुढे इंडिया इंक., बैजू, अ‍ॅमेझॉन आणि कोकाकोला या कंपन्यांनी दावेदारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी कोण हे हक्क मिळवणार, हे क्रिकेटजगतात उत्सुकतेचे ठरत आहे.

संयुक्त अरब अमिराती येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ‘आयपीएल’ खेळवण्यात येणार आहे. परंतु भारत-चीन यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्याने विवोने शीर्षक प्रायोजकत्वाचा करार रद्द केला. म्हणूनच आता लवकरात लवकर नवा शीर्षक प्रायोजक शोधण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे.

सध्या इंडिया इंक. आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात शीर्षक प्रायोजकत्वाचे हक्क मिळवण्यासाठी जोरदार चुरस असल्याचे समजते. परंतु भारताच्या जर्सीचे प्रायोजक असलेल्या बैजूलाही या शर्यतीत अनपेक्षितपणे लाभ होऊ शकतो. बैजूने ३०० कोटींच्या कराराचा पर्याय ‘बीसीसीआय’ ठेवला आहे. विवोकडून ‘बीसीसीआय’ला दरवर्षी ४४० कोटींचा लाभ व्हायचा. परंतु सध्याची स्थिती पाहता ‘बीसीसीआय’ फक्त ५० टक्के तोटा सहन करून इच्छुक प्रायोजकांपैकी एकाला शीर्षक प्रायोजक बनवण्यास तयार आहे.

‘‘यंदा दिवाळीपूर्वीच्या काळात ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येणार असल्याने ऑनलाइन खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाकडून ‘बीसीसीआय’ला नफा होऊ शकतो. इंडिया इंक.शी करार करण्यासाठी ‘बीसीसीआय’ला त्या तुलनेत फारसा लाभ होणार नाही. बैजू आणि कोकाकोला यांच्याशीही ‘बीसीसीआय’ची चर्चा सुरू असून लवकरच अंतिम शीर्षक प्रायोजक ठरवण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

दोन सहप्रायोजकांचाही ‘बीसीसीआय’ला शोध

शीर्षक प्रायोजकाव्यतिरिक्त ‘बीसीसीआय’ दोन सहप्रायोजकांचा शोध घेत आहे. एखाद्या कंपनीला शीर्षक प्रायोजकत्व न मिळाल्यास किमान सहप्रायोजक बनण्याची संधी याद्वारे मिळू शकते. परंतु सहप्रायोजकांसाठी ड्रीम ११, अन अकॅडमी यांनीही उत्साह दर्शवल्याचे समजते. त्याचप्रमाणे ‘आयपीएल’मधील सहा संघांचा थेट चिनी उत्पादकांशी संबंध असल्याने त्याबाबत ‘बीसीसीआय’ कोणते धोरण लागू करणार, याकडेही सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे.