पूर्वेकडील क्रिकेट नैपुण्यास अधिकाधिक संधी मिळावी या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या स्थानिक स्पर्धामध्ये पूर्वेकडील सर्व राज्यांचा समावेश केला आहे. रणजी स्पर्धेस एक नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.

रणजी स्पर्धेत ३७ संघांचा समावेश असून नव्याने समाविष्ट केलेल्या अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड या नऊ संघांना प्लेट विभागात स्थान मिळाले आहे. प्लेट विभागातील पहिले दोन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना अव्वल श्रेणी ‘क’ विभागात स्थान मिळेल. या विभागातील पहिल्या दोन संघांना अनुक्रमे अव्वल श्रेणी ‘अ’व ‘ब’ विभागात स्थान देण्यात येईल. अव्वल श्रेणी ‘अ’ व ‘ब’ विभागात प्रत्येकी दहा संघांचा समावेश असेल.

स्थानिक सामन्यांना वरिष्ठ महिलांच्या चॅलेंजर स्पर्धेद्वारे प्रारंभ होईल. ही स्पर्धा १३ ते २० ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल. पुरुषांच्या सामन्यांना दुलीप करंडक स्पर्धेद्वारे प्रारंभ होईल. ही स्पर्धा दिवसरात्र स्वरूपाची राहणार असून १७ ऑगस्ट रोजी स्पर्धेस प्रारंभ होईल. त्यानंतर विजय  हजारे चषक स्पर्धा होईल.

नवीन वेळापत्रकानुसार रणजी स्पर्धा ही १ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात एकूण १६० सामने खेळले जाणार आहेत. तर ट्वेन्टी-२० सय्यद मुश्ताक अली चषकामध्ये १४० सामने होणार आहेत. पुरुषांच्या २३ वर्षांखालील गटासाठी ३०२ तर महिलांसाठी २९२ सामने होतील. वरिष्ठ महिलांसाठी २९५ सामने तर १९ वर्षांखालील युवकांसाठी २८६ सामने होतील.