दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने २०३ धावांनी बाजी मारत १-० ने आघाडी घेतली. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा यांनी आक्रमक फलंदाजी केली. तर गोलंदाजीमध्ये रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. विशेषकरुन दुसऱ्या डावात शमीने आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शमीने घेतलेल्या ५ विकेटपैकी ४ विकेट या त्रिफळाचीत होत्या. २०१८ सालापासून शमीने कसोटी क्रिकेटमध्ये ३ वेळा दुसऱ्या डावात ५ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. फिरकीपटूंनी गाजवलेल्या सामन्यात शमीची ही कामगिरी विशेष उठून दिसली. कर्णधार विराट कोहलीनेही सामना संपल्यानंतर शमीचं कौतुक केलं.

कसोटी सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शमीच्या या भेदक गोलंदाजीमागचं खरं कारण सांगितलं. मोहम्मद शमीच्या कामगिरीबद्दल विचारलं असता रोहित म्हणाला, “शमी ज्यावेळी नव्या दमाने मैदानात उतरतो त्यावेळी तो काय करु शकतो हे आपण पाहिलं आहे, सोबतीला बिर्याणी हवीच!” BCCI ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबररोजी पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीतील विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याचसोबत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं आवश्यक आहे.