करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी भारतात कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामासह सर्व महत्वाचे सामने रद्द केलेत. मात्र या काळात होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने खेळाडूंना पुन्हा सराव सुरु करण्यासाठी काही नियमावली आखून दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मराठमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूरने पालघरमध्ये आपल्या घराजवळील मैदानात सरावाला सुरुवात केली होती. मात्र यासाठी त्याने बीसीसीआयची परवानगी घेतलेली नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

सध्या भारतीय संघाबाहेर असलेला आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व करणारा दिनेश कार्तिकलाही आता सरावाचे वेध लागले आहेत. “सराव सुरु करुन नेहमीप्रमाणे गती पकडायला किमान ४ आठवड्यांचा कालावधी जाईल असं मला वाटतंय. हा बदल हळुहळु अंगवळणी पडेल. चेन्नईमध्ये सध्या लॉकडाउनमध्ये थोडी शिथीलता आणली आहे. त्यामुळे तुम्ही परवानगी घेऊन सरावाला सुरुवात करु शकता. त्यामुळे मी देखील योग्य वेळ बघून सरावाला सुरुवात करण्याचा विचार करत आहे. घरी बसायचं आणि काहीच करायचं नाही, मला झोंबी झाल्यासारखं वाटतंय.” दिनेश कार्तिक Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत दिनेश कार्तिकला भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र यानंतर तो संघाबाहेर फेकला गेला. दरम्यान, करोनाच्या प्रादूर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.