महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुष शहरी गटात बँक ऑफ इंडिया, पुरुष ग्रामीण विभागात आरसीएफ (थळ) आणि महिला गटात देना बँक विजेतेपदाचे मानकरी ठरले.
पुरुष शहरी विभागाच्या चुरशी सामन्यात पहिल्या सत्रात युनियन बँकेने ६-३ अशी आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात बँक ऑफ इंडियाने त्वेषाने मुसंडी मारत ९-९ अशी बरोबरी साधली. मग पाच-पाच चढायांच्या डावात बँक ऑफ इंडियाने ७-६ असा विजय मिळवला. त्यांच्या राजेंद्र देशमुखने खोलवर चढाया केल्या, तर प्रथमेश नभेने दमदार पकडी केल्या. युनियन बँकेच्या अजिंक्य कापरे आणि सागर कुराडे यांनी लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन केला.
पुरुष ग्रामीण विभागात जेएसडब्ल्यू (साळाव) संघाने पहिल्या सत्रात ६-३ अशी आघाडी घेतली होती. परंतु आरसीएफ संघाने दुसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतला आणि १८-१६ अशा फरकाने विजय मिळवला. आरसीएफकडून रमेश पाटील आणि शशांक पाटील यांनी अप्रतिम चढायांचा खेळ केला.
महिलांमध्ये सोनाली शिंगटे, अपेक्षा टाकळे यांच्या लाजवाब चढाया आणि रेखा सावंतच्या पकडींच्या बळावर देना बँकेने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबवर १३ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. शिरोडकर संघाकडून स्नेहल साळुंखे, रजनी आरडे आणि नेहा  कदम यांचे प्रयत्न अपुरे ठरले.