पीटीआय, टोरंटो (कॅनडा)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या पाचही बुद्धिबळपटूंनी ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील आपल्या मोहिमेस बरोबरीने सुरुवात केली. त्यातही आर. प्रज्ञानंदचे यश खास ठरले. त्याने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या अलिरेझा फिरूझाला बरोबरीत रोखले. खुल्या विभागात डी. गुकेश आणि विदित गुजराथी, तसेच महिलांमध्ये कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली या भारतीयांमध्ये झालेले पहिल्या फेरीतील सामनेही बरोबरीत सुटले.

टोरंटो, कॅनडा येथे होत असलेल्या यंदाच्या स्पर्धेला सहभागी बुद्धिबळपटूंनी सावध सुरुवात केली. पुरुष विभागातील चारही लढती बरोबरीत सुटल्या. महिला विभागात तीन लढती बरोबरीत राहिल्या, तर केवळ एका लढतीचा निकाल लागला. यात टॅन झोंगीने ले टिंगजीचा पराभव केला.

संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती मिळत असलेले फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा हे अमेरिकेचे ग्रँडमास्टर पहिल्याच फेरीत समोरासमोर आले. दोघांनीही धोका न पत्करता ही लढत बरोबरीत सोडवणे पसंत केले. अझरबैजानच्या निजात अबासोवला नमवण्यात रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला अपयश आले. 

हेही वाचा >>>IPL 2024: ‘सूर्या’ उगवला; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, संघात दाखल होताच सुरू केला सराव

प्रज्ञानंदने काळय़ा मोहऱ्यांसह खेळताना रुय लोपेझ पद्धतीने सुरुवात करण्यास पसंती दिली. फिरूझानेही आपल्या लौकिकाला साजेशी सुरुवात केली. प्रज्ञानंदने राजाच्या बाजूने आक्रमण करण्याची संधी शोधली. त्यानंतर फिरूझाने प्रतिआक्रमण करताना २९व्या चालीला मोहरे आणि पाठोपाठ घोडय़ाचे बलिदान देत डाव वेगळय़ाच वळणावर नेऊन ठेवला. अशा वेळी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करताना प्रज्ञानंदने बचाव भक्कम करण्यावर भर दिला आणि चालींच्या पुनरावृत्ती होत असताना ३९व्या चालीला दोघांनी सामना बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेतला.

गुकेश आणि विदित या भारतीयांमधील डावही असाच चालींच्या पुनरावृत्तींमुळे बरोबरीत सुटला. सर्वोच्च स्तरावर फारसा वापर न होणाऱ्या ताराश बचाव पद्धतीने विदितने खेळ केला. त्यामुळे गुकेशने फारसा धोका पत्करणे टाळले. त्यामुळे पटावर स्थिर स्थिती निर्माण झाली होती. विदित अशामध्येही संतुलित स्थितीत संधी शोधत राहिला आणि १७व्या चालीला त्याने उंटाचे बलिदान देण्याची कल्पक चाल रचली. मात्र, गुकेशनेही तशाच चालीची पुनरावृत्ती केली. पुढे चालींची पुनरावृत्ती होत राहिल्याने दोघांनी डाव बरोबरीत सोडण्यास पसंती दिली.

हेही वाचा >>>Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

‘‘उंटाचे बलिदान मला अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी तशीच चाल खेळण्यास पसंती दिली. पहिल्या निकालावर मी समाधानी आहे,’’ असे गुकेश म्हणाला. ‘‘मला ताराश बचावाची कल्पना डाव सुरू झाल्यावर १० मिनिटांतच आली आणि पुढील २५ मिनिटे पुन:पुन्हा एकच चाल रचणे मी टाळत होतो. पटावरील परिस्थिती लक्षात घेता डाव बरोबरीत सुटणार याची खात्री होती,’’ असे विदित म्हणाला.

स्पर्धेदरम्यान विदितबरोबर सूर्यशेखर गांगुली आणि डॅनियल कोवाचुरो साहाय्यक म्हणून काम करत आहेत. गुकेशला पोलंडच्या ग्रेगॉर्ज गजेवस्कीची साथ मिळत आहे.

महिला विभागात वैशालीने आपली अनुभवी सहकारी हम्पीला रोखण्यात यश मिळवले. वैशालीने इटालियन सुरुवात करताना उत्तरार्ध सहज होईल याची काळजी घेतली. अखेर ४१व्या चालीला दोघींनी बरोबरी मान्य केली.

निकाल (पहिली फेरी)

’ खुला विभाग : अलिरेझा फिरूझा बरोबरी वि. आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश बरोबरी वि. विदित गुजराथी, फॅबियानो कारुआना बरोबरी वि. हिकारू नाकामुरा, निजात अबासोव बरोबरी वि. इयान नेपोम्नियाशी.

’ महिला : आर. वैशाली बरोबरी वि. कोनेरू हम्पी, टॅन झोंगी विजयी वि.ले टिंगजी, अ‍ॅना मुझिचुक बरोबरी वि. नुरग्युल सलिमोवा, अलेक्झांड्रा गोर्याचकिना बरोबरी वि. कॅटेरिना लायनो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates chess tournament r pragyanand success in defeating alireza firooza sport news amy