पीटीआय, चेन्नई
जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी आव्हानवीर ठरवणाऱ्या ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सर्वात युवा विजेत्या भारताच्या डी. गुकेशने आपल्या यशाचे श्रेय पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला दिले आहे. विशी सरांच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो, असे गुकेश म्हणाला.

१७ वर्षीय गुकेशने टोरंटो, कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला. त्याने महान गॅरी कास्पारोवचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर गुकेश बुधवारी मध्यरात्री मायदेशी परतला. त्याचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत झाले. त्यानंतर त्याने माध्यमांशीही संवाद साधला.

‘‘विशी सरांकडून मला खूप प्रेरणा मिळते. त्यांच्या अकादमीत मिळालेल्या शिकवणीचा मला खूप फायदा झाला आहे. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो,’’ असे गुकेश म्हणाला. गुकेश हा वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीचा भाग आहे. विशेष म्हणजे ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकणारा गुकेश हा आनंदनंतरचा केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. गुकेश आता या वर्षांच्या अखेरीस जगज्जेतेपदासाठी डिंग लिरेनला आव्हान देईल.

हेही वाचा >>>SRH vs RCB : आरसीबीने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

‘‘डिंगविरुद्धच्या लढतीसाठी पूर्णपणे तयार असणे हे माझ्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. बुद्धिबळातील ही सर्वात मोठी लढत आहे. त्यात यश मिळवायचे असल्यास तुम्ही चांगली मानसिकता राखणे खूप आवश्यक आहे. याकडेही मी लक्ष देईन. माझ्याकडून खूप लोकांना अपेक्षा आहे. माझा स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मी ‘कँडिडेट्स’मध्ये जसा खेळलो, त्याच योजनेसह जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीतही खेळेन. मला यश मिळेल अशी आशा आहे,’’ असे गुकेशने नमूद केले.

आईचे आनंदाश्रू, ८० शाळकरी मुले आणि बरेच काही..

‘कँडिडेट्स’मधील ऐतिहासिक कामगिरीनंतर गुकेश बुधवारी मध्यरात्री मायदेशात परतला. मध्यरात्री तीन वाजता चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुकेशचे जंगी स्वागत झाले. तो विद्यार्थी असलेल्या वेलाम्मल विद्यालयाची ८० मुले बुद्धिबळाचा पट हाती घेऊन आणि गुकेशचा चेहरा असलेले मुखवटे घालून दुतर्फा उभी राहिली. त्यांच्या मधून गुकेश आपल्या वडिलांसह विमानतळावरून बाहेर आला. यावेळी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि तमिळनाडूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) अधिकारी, तसेच चाहते उपस्थित होते. प्रचंड गर्दीतही गुकेशची सर्वप्रथम नजर गेली ती आपली आई पद्माकडे. आईने त्याला कडाडून मिठी मारली आणि शाबासकी दिली. या वेळी तिच्या डोळय़ात आनंदाश्रू होते. ‘माझे यापेक्षा चांगले स्वागत होऊ शकले नसते. इतके लोक बुद्धिबळावर प्रेम करतात हे पाहून खूप छान वाटले,’ असे गुकेश म्हणाला. या वेळी गुकेशचे मोठा हार आणि पिवळय़ा रंगाची पगडी घालून स्वागत करण्यात आले.

जागतिक अजिंक्यपद लढतीच्या यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील!

’ विद्यमान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि गुकेश यांच्यात या वर्षांअखेरीस होणारी जागतिक अजिंक्यपदाची लढत भारतात व्हावी यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ प्रयत्नशील असल्याचे नवनियुक्त सचिव देव पटेल यांनी गुरुवारी सांगितले.

’ १७ वर्षीय गुकेशने नुकतीच झालेली ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकून सर्वात युवा आव्हानवीर ठरण्याचा मान मिळवला. जगज्जेतेपदासाठी होणाऱ्या लढतीच्या तारखा आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ही लढत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल असे ‘फिडे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इमिल सुटोव्स्की म्हणाले होते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

’  ‘‘आम्ही जागतिक बुद्धिबळ महासंघ अर्थात ‘फिडे’शी चर्चा करायला तयार आहोत. जागतिक अजिंक्यपद लढत खेळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय भारतच आहे हे आम्ही त्यांना पटवून देऊ,’’ असे देव पटेल म्हणाले. अवघ्या २४ वर्षांचे असणारे पटेल हे गुजरात बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्षही आहेत.