जपान ग्रां. प्रि.दरम्यान ज्युलेस बिआंचीला झालेल्या अपघातातून फॉम्र्युला-वनने धडा घेतला असून आता सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाचे (फिया) अध्यक्ष जीन टॉड आणि शर्यत संचालक चार्ली व्हाइटनिंग यांनी रशियन ग्रां.प्रि. शर्यतीच्या पूर्वसंध्येला बैठक बोलावून याबाबतीतचे संकेत दिले आहेत. मॉरुसिया संघाचा ड्रायव्हर बिआंचीच्या अपघाताबाबतची माहितीही त्यांनी या वेळी उघड केली. या वेळी एड्रियन सुटील आणि बिआंची यांच्या अपघातादरम्यानचे चित्रण दाखवण्यात आले. ‘‘एका धोकादायक वळणावर सुटीलचा अपघात झाल्यानंतर सव्‍‌र्हिस ट्रॅक्टर बोलावण्यात आला. त्या वेळी दोन पिवळे झेंडे दाखवण्यात आले होते. याचा अर्थ, ड्रायव्हर्सनी कारचा वेग कमी करायला हवा होता. पण पुढील लॅपदरम्यान याच वळणावर बिआंचीची कार ट्रॅक्टरला जाऊन आदळली,’’ असे व्हाइटनिंग म्हणाले. पण अपघाताच्या वेळी बिआंचीच्या कारचा वेग किती होता, हे त्यांनी उघड केले नाही. मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टनने रशियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या पात्रता फेरीवरही वर्चस्व गाजवत अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावले आहे. त्याचा सहकारी निको रोसबर्ग दुसरा तर विल्यम्सचा वाल्टेरी बोट्टास तिसरा आला.