पी.व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी चीन मास्टर्स ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. किदम्बी श्रीकांतचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल सोळा खेळाडूंमध्ये स्थान पटकावणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत दमदार प्रदर्शनासाठी भारतीय बॅडमिंटनपटू उत्सुक आहेत.
चौथ्या मानांकित सिंधूने जपानच्या नात्सुकी निदाइरावर २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे सिंधूला यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेद्वारे विजयपथावर परतत जेतेपद पटकावण्यासाठी सिंधू आतुर आहे. पुरुषांमध्ये सातव्या मानांकित प्रणॉयने चीनच्या ह्य़ुआंग युक्सिआंगवर २१-१३, २१-११ अशी मात केली. यंदाच्या हंगामात प्रणॉयला सुपरसीरिज स्पर्धामध्ये सातत्याने झटपट गाशा गुंडाळायला लागला आहे.
दुहेरी प्रकारात प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर जोडीने सिंगापूरच्या योंग काइ टेरी ही आणि किआन हिआन लोह जोडीचा २१-१८, २१-१३ असा पराभव केला. रुड बॅच आणि ऑलिव्हर ल्येडॉन डेव्हिस जोडीने मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीला २१-१९, २१-१६ असे नमवले. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने मलेशियाच्या मेई कुआन चोयू आणि मेंग यिआन ली जोडीवर २१-१६, २१-१८ अशी मात केली.
पात्रता फेरीच्या लढतीत किदम्बी श्रीकांतला पराभवाला सामोरे जावे लागले. तैपेईच्या लिन यु सेइनने श्रीकांतवर २१-१२, २१-१७ असा विजय मिळवला. या पराभवामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी श्रीकांतसमोरचा मार्ग खडतर झाला आहे.