भारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाका कायम राखताना अखेरच्या दिवशी दोन कांस्यपदक नावावर केली. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेल्या मनिकाने आपल्या खात्यात आणखी एक पदक जमा केले.

तिने मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी. साथियनसह बाजी मारली. बत्रा व साथियन या जोडीने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा ११-६, ११-२, ११-४ असा पराभव केला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील बत्राचे हे चौथे पदक ठरले. यापूर्वी तिने महिला एकेरीच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह महिला सांघिक गटात बाजी मारली होती. तसेच महिला दुहेरीत मौमा दासच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

दरम्यान शरथ कमलने पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या सॅम्युएल वॉल्करचा ११-७, ११-९, ९-११, ११-६, १२-१० असा पराभव केला. त्याचेही या स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले. त्याने पुरुष सांघिक गटात सुवर्ण आणि साथियनसह पुरुष दुहेरी गटात रौप्यपदक जिंकले आहे. दहा सदस्यीय टेबल टेनिस संघाने एकूण ८ पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी ठरली.

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर बत्राने २०२०चे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा लक्ष्य असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘मिश्र दुहेरीत साथियनसोबत २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ केला, परंतु दुर्दैवाने मिश्र दुहेरीसाठी अधिकच्या स्पर्धा नाहीत. आम्ही पोर्तुगालमध्ये सराव करत आहोत आणि हे आमचे मिश्र दुहेरीतील पहिले पदक आहे.’’