सलग दुसऱयांदा चिलीला कोपा अमेरिकाचे जेतेपद

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चिलीने आपल्या अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश करत सलग दुसऱयांदा स्पर्धेच्या जेतेपदाचा मान पटकावला आहे. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चिलीने अर्जेंटिनावर ४-२ असा रोमहर्षक विजय प्राप्त केला. कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावून संघाचा २३ वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी उत्सुक होता. मात्र, अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाला चिली ‘तिखट’ ठरली. गतवर्षी देखील अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘चिली’ने रोखले होते. यंदाही चिलीने अर्जेंटिनाच्या स्वप्नांना सुरूंग लावला.
सामन्याच्या निर्धारित वेळत दोन्ही संघांना एकही गोल झळकावता आला नाही. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांमधील झुंज कायम राहिली आणि फूल टाईमपर्यंत सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने चिलीचा पहिला गोल अडवून चांगली सुरूवात केली. पण अर्जेंटिनाकडूनही पहिल्या संधीत मेस्सीन निराशा केली. मेस्सीला गोलपोस्ट लक्ष्यवेध घेता आला नाही. पुढील दोन्ही संधीत दोन्ही संघांनी गोल झळकावून २-२ अशी बरोबरी केली होती. त्यानंतर चिलीच्या ब्राव्होने अर्जेंटिनाचे गोल अडवून आघाडी घेत सामना ४-२ असा खिशात घातला.