सरत्या वर्षांत राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अनेक धक्कादायक व सुखकारक अशा दोन्ही गोष्टी फुटबॉलप्रेमींनी अनुभवल्या. एकीकडे जागतिक फुटबॉल संघटनेमागे (फिफा) लागलेला भ्रष्टाचार व लाचखोरीच्या प्रकरणांचा ससेमिरा, तर दुसरीकडे बार्सिलोनाचे क्लब फुटबॉल स्पर्धामधील अभूतपूर्व यश.. भारतीय फुटबॉल क्षेत्रातही काही सकारात्मक बदल पाहायला मिळाले. विश्वचषक पात्रता फेरीतील भारतीय संघाच्या कामगिरीची मीमांसा करायची झाल्यास त्यांना दहापैकी ५ गुण नक्की द्यायला हवेत. भारत विश्वचषक स्पध्रेत खेळणे पुढील २०-२५ वर्षांत तरी शक्य नसले तरी त्यांच्या कामगिरीत झालेली सुधारणा ही कौतुकास पात्र आहे. याचे काही अंशी श्रेय इंडियन सुपर लीगला (आयएसएल) द्यायला हरकत नाही.

बार्सिलोना सुसाट.. चेल्सीचा निराशावादी पाढा

लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या त्रिकुटाने २०१४-१५ चा फुटबॉल हंगाम गाजवला. या त्रिकुटाने मिळून १२२ हून अधिक गोल्सची नोंद करून आपला क्लब बार्सिलोनाला ला लिगा़, कोपा डेल रे आणि युएफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावून दिले. एकाच हंगामात तीन प्रमुख स्पर्धाची जेतेपद जिंकण्याची बार्सिलोनाची ही दुसरी वेळ. याआधी २००९ मध्ये त्यांनी हा विक्रम नोंदवला होता. १७ मे २०१५ मध्ये बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर कुरघोडी करून ला लिगा स्पध्रेचे २३ वे जेतेपद नावावर केले. गेल्या दहा वर्षांतील त्यांचे हे सातवे जेतेपद ठरले. याच महिन्याच्या अखेरीस बार्सिलोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओचा पराभव करून कोपा डेल रे चषक जिंकला. ६ जून रोजी युव्हेंट्सचा पराभव करून बार्सिलोनाने युएफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही जिंकून विक्रमाची नोंद केली. या तिन्ही जेतेपदांमध्ये मेस्सी-सुआरेझ-नेयमार या त्रिमूर्तीचा सिंहाचा वाटा होता. मेस्सीने सर्वाधिक ४८ गोल्सची नोंद केली. तसेच युएफा सुपर चषक व फिफा क्लब विश्वचषकावरही बार्सिलोनाने नाव कोरले. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गतविजेत्या चेल्सीच्या मागे साडेसातीच लागली. जोस मोरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सीला ईपीएल जेतेपदाच्या शर्यतीतही टिकाव धरता आला नाही. गतवर्षीचे विजेते यंदा १५ व्या स्थानावर फेकले गेले. या निराशाजनक कामगिरीमुळे मोरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात आली. याउलट गतवर्षी ईपीएलच्या गुणतालिकेत तळाला असलेल्या लेईस्टरने ‘गरुडभरारी’ घेतली. लेईस्टरने (३८ गुण) १७ सामन्यांमध्ये ११ विजय, ५ अनिर्णित आणि १ पराभव अशा निकालासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

भारत विश्वचषकापासून दूरच..

फुटबॉल विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचे भारताचे स्वप्न पुढील दोन-तीन दशके तरी पूर्ण होणे नाही. आशियाई संघांमध्ये पाहायला मिळत असलेल्या प्रगतीच्या तुलनेत भारतीय संघ अजूनही पहिल्या पाच पायऱ्यांवर अडकलेला दिसतो. २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेतील पात्रता फेरीत भारताला आत्तापर्यंत ‘ड’ गटात एकमेव विजयावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पध्रेच्या मार्गातही भारताने स्वत:हून अडथळे निर्माण केले आहेत.

इंडियन सुपर लीगचा नवा जेता

भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकणाऱ्या इंडियन सुपर लीगला चेन्नईयन एफसी हा  नवा जेता लाभला.  प्रेक्षकसंख्या वाढली असली, तरी वातावरण निर्मितीत आयएसएलला अपयश आले आहे.

‘फिफा’मधील भ्रष्टाचाराचा गाळ : मे २०१५ च्या पहिल्या आठवडय़ात स्वित्र्झलड येथील फिफाच्या मुख्यालयावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकून फिफाच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांसह १४ जणांना ताब्यात घेतले. भ्रष्टाचार, लाचखोरी, आर्थिक गैरव्यवहार आदी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले. लगेचच अमेरिकेनेही फिफाच्या १४ अधिकाऱ्यांवर याच गुन्ह्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. या घटनेने जागतिक स्तरावरील फिफाची प्रतीमा मलिन केलीच, तसेच क्रीडाप्रेमींच्या विश्वासार्हतेला तडाही दिला. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे दीर्घकाळ फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या सेप ब्लाटर यांना पायउतार व्हावे लागले. त्यापाठोपाठ त्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. युरोपियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष व फिफाचे उपाध्यक्ष मायकल प्लॅटिनी, अलेझांड्रो बुर्झाको, कार्लोस चॅवेझ, अ‍ॅरोन डेव्हिडसन, राफेल इस्क्वीव्हेल, इयुजेनिओ फिगुएरेडो, जॅक वॉर्नर, कोस्टास टक्कास, जेफ्री वेब, एडुआडरे ली आदी प्रमुख मान्यवरांवर आरोप ठेवण्यात आल्यामुळे फिफाची प्रतिमा डागाळली गेली. २०१८ व २०२२ च्या विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद अनुक्रमे रशिया व कतार यांना दिल्यामुळे हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा आरोप झाला, परंतु त्यात तथ्य नाही. अमेरिका आणि स्वित्र्झलड पोलिसांनी संपूर्ण तपास करून आणि योग्य पुराव्यांची जुळवाजुळव करूनच ही कारवाई केली आहे. ब्लाटर यांचा या भ्रष्टाचारात हात बरबटलेला नसला तरी या सर्व प्रकरणामागचे ते मुख्य सूत्रधार आहेत, हेही नाकारणे तितकेच अवघड आहे. या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा खोलवर रुतलेला ‘गाळ’ उपसण्यास आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आणि २०१६ च्या रशिया विश्वचषकापर्यंत फिफाचे शुद्धीकरण होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com