दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात १२० धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वात कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने ३० वर्ष आणि ९९ दिवस असे वय असताना १०,००० धावा केल्या होत्या. तर डी कॉकचे वय २८ वर्षे आणि २११ दिवस असे आहे.

डी कॉकने २५९ डावात १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने यासाठी २७२ डाव खेळले होते. धोनीने २९३ डावात १०,०००  धावा पूर्ण केल्या.

 

या सामन्यात डी कॉक आणि जानेमान मलान यांच्यात २२५ धावांची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडला ७० धावांनी पराभूत केले. यासह ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४ गडी राखून ३४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा संघ २७६ धावा करुन सर्वबाद झाला. डी कॉकने ९१ चेंडूत १२२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ११ चौकार ठोकले.

हेही वाचा – VIDEO : नादच खुळा..! विंडीजच्या खेळाडूनं घेतलेला झेल एकदा पाहाच

डी कॉकच्या नावावर अजून एक विक्रम

डी कॉक १६ वनडे शतके ठोकणारा सर्वात वेगवान यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने १२४ डावात १६ वनडे शतके ठोकली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १६ शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने हा पराक्रम अवघ्या ९४ डावात केला. भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी ११० डावात १६ वनडे शतके ठोकली.