पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजची नाराजी

बर्मिगहॅम : माझ्या शरीरयष्टी आणि चेहऱ्यावरून डुक्कराशी तुलना केल्यामुळे मी फार निराश झालो आहे. परंतु चाहत्यांच्या रोषापुढे तुम्ही काहीही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने बुधवारी व्यक्त केली.

भारताविरुद्ध पराभूत झाल्यामुळे सर्फराजला समाजमाध्यमांवर टीकेला सामोरे जावे लागले. त्याचे भर मैदानात जांभई देतानाचे छायाचित्रही फार चर्चेत होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्फराज त्याच्या मुलासह इंग्लंडमधील मॉलमध्ये फिरत असताना एका चाहत्यासोबत त्याच्या झालेल्या चकमकीची चित्रफित मंगळवारी समाजमाध्यमांवर फार चर्चेत होती. या चित्रफितीत चाहता सर्फराजला तू डुकरासारखा दिसतो, असे म्हणत असल्याचे निदर्शनास येते.

या घटनेविषयी सर्फराज म्हणाला, ‘‘मला त्या चित्रफितीविषयी काहीही बोलण्याची इच्छा नाही. किंबहुना चाहत्यांनी आमच्याविषयी काय बोलावे अथवा बोलू नये, हे आम्ही ठरवू शकत नाही. जय-पराजय या दोन्ही खेळाच्याच बाजू असून भारताविरुद्ध पराभूत झालेला आमचा एकमेव संघ नाही. आमच्यापूर्वी इतर संघांनीही त्यांच्याविरुद्ध पराभव पत्करला.’’

‘‘यापूर्वीसुद्धा काही चाहत्यांनी माझ्यावर विविध पद्धतीने टीका केली आहे. परंतु एका जनावराशी माझी तुलना केल्यामुळे मी फार निराश झालो आहे. अशा घटनांमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे चाहत्यांनी टीका करावी, पण गैरवर्तन अथवा त्याला शिवीगाळ करू नये, ’’ असेही सर्फराजने सांगितले. विश्वचषकात पाकिस्तानचा पुढील सामना शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. त्याशिवाय मंगळवारी इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्यापही जिवंत आहेत.