Racism in IPL : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. IPL मध्ये मला संघातील काही खेळाडू काळू म्हणायचे, असं डॅरेन सॅमीने सांगितलं होतं. त्यावर एका चाहत्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण सॅमीने त्याला रोखठोख उत्तर देत गप्प केलं. पण आता मात्र सॅमीचा काळू या शब्दासंबंधी गैरसमज दूर झाला असल्याचे सॅमीने म्हटले आहे.

काळू हा शब्द नेहमी वर्णद्वेष व्यक्त करण्यासाठी वापरला जात नाही. भारतीय कुटुंबांमध्ये काही वेळा प्रेमाने अशी हाक मारली जाते, असे सांगत एका चाहत्याने सॅमीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, जर काळू या शब्दाला वर्णद्वेषाची किनार असेल, तर तो शब्द कोणीच वापरू नये, असे उत्तर देत सॅमीने चाहत्याला गप्प केलं होतं. आता मात्र सॅमी एक ट्विट करून या साऱ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “वर्णद्वेषाच्या प्रकरणासंदर्भात मी एका माजी सहकाऱ्याशी सकारात्मक चर्चा केली. त्याच्या उत्तराने मी समाधानी आहे. आम्ही नकारात्मकता पसरवण्यापेक्षा लोकांना याबाबत शिक्षित केलं पाहिजे यावरही चर्चा केली. ते लोक मला प्रेमाने ‘काळू’ म्हणत असल्याचे त्याने मला सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे”, असे ट्विट सॅमीने केले.

काय म्हणाला होता डॅरेन सॅमी?

“मी IPL मध्ये हैदराबाद संघाकडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेरा दोघांनीही संघात काळू या नावाने संबोधलं जायचं. मला आधी वाटलं होतं की हा कुठला तरी चांगला शब्द असेल. पण त्याचा संदर्भ लागल्यावर आणि समजल्यावर मला आणखीनच दुःख झालं”, असं सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले. या आधीही सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती.