नौकानयनातील पदकाबाबत सर्वाधिक आशा असलेल्या दत्तू भोकनळकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा फटका त्याला बसल्याने तो पदकापासून वंचित राहिला. सिंगल स्कल प्रकारातील त्याच्या शर्यतीत दत्तू सहाव्या स्थानावर फेकला गेला.

सिंगल स्कल प्रकारातील या स्पर्धेत दत्तूने चांगली सुरुवातदेखील केली होती. मात्र शर्यतीच्या प्रारंभापूर्वी ओव्हर लॉकला बंद न केल्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. चांगल्या प्रारंभानंतर साधारणपणे १२०० मीटर अंतरावर त्याच्या नौकेचा वेग मंदावला. त्यामुळे प्रारंभी पुढे असलेली दत्तूची नौका पिछाडीवर फेकली गेली. शर्यत संपवण्यासाठी त्याला तब्बल ८ मिनिटे २८ सेकंद आणि ५६ शतांश सेकंदांचा वेळ लागला. सूत्रांनुसार कोणत्याही शर्यतीपूर्वी नौकानयनपटूने ते ओव्हर लॉक बंद करणे अत्यावश्यक असते. मात्र, दत्तूकडून ते करायचे राहून गेले असण्याची शक्यता आहे. दत्तू हा प्रत्येक लढतीत ७ मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतो. परंतु नेमक्या या पदकाच्या लढतीत त्याला वेळ लागल्याने सिंगल स्कलमधील पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. चीनच्या लिअ‍ॅँग ७ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ घेत सुवर्णपदक पटकावले.