विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

झारखंडवर दोन विकेट आणि दोन चेंडू राखून विजय

पवन नेगीने कठीण परिस्थितीत तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जिद्दीने किल्ला लढवला. त्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत दिल्लीने झारखंडचा दोन विकेट आणि दोन चेंडू राखून पराभव करताना विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. शनिवारी दिल्लीची जेतेपदाची लढत मुंबईशी होणार आहे.

झारखंडने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान पेलताना दिल्लीची ८ बाद १४९ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. परंतु नेगीने नाबाद ३९ धावांची झुंजार खेळी साकारताना १०व्या क्रमांकावरील फलंदाज नवदीप सैनी (नाबाद १३) सोबत नवव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

झारखंड : ४८.५ षटकांत सर्व बाद १९९ (विराट सिंग ७१, आनंद सिंग ३६; नवदीप सैनी ४/३०) पराभूत वि. दिल्ली : ४९.४ षटकांत ८ बाद २०० (पवन नेगी नाबाद ३९, नितीश राणा ३९; आनंद सिंग ३/३९)

सामनावीर : नवदीप सैनी.