भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मनोज तिवारीने देवधर करंडकाच्या उत्तर विभागाविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार दीडशतकी खेळी साकारत पूर्व विभागाला ५२ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचचला.
उत्तर विभागाने नाणेफेक जिंकत पूर्व विभागाला फलंदाजीसाठी पाचारण करत त्यांची २ बाद ३३ अशी अवस्था केली होती; पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिवारीने उत्तर विभागाच्या गोलंदाजांवर चौफर हल्ला चढवला. एका टोकाकडून ठरावीक अंतराने पूर्व विभागाचे फलंदाज बाद होत असले तरी तिवारीचा हल्ला बोल काही कमी झाला नाही.
शतक झळकावल्यावर तर तिवारी अधिक आक्रमक झाला आणि त्याने शतकानंतरचे अर्धशतक २७ चेंडूंमध्ये पूर्ण केले. तिवारीने पूर्व विभागाच्या गोलंदाजीला निष्प्रभ करत १२१ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १५१ धावांची खेळी साकारली. २००४ नंतरची देवधर करंडकातील ही सर्वाधिक खेळी आहे. तिवारीच्या दीडशतकाच्या जोरावर पूर्व विभागाने २७३ धावांपर्यंत मजल मारली.
पूर्व विभागाच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर विभागाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी अनुभवी युवराज सिंगसह (४) तीन फलंदाजांना अवघ्या २९ धावांमध्ये गमावले आणि तिथूनच उत्तर विभागाच्या हातून सामना निसटला. गुरकिरात सिंग मानने १० चौकार आणि एका षटकारांसह ८३ धावांची खेळी साकारली खरी; पण अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग : ५० षटकांत ८ बाद २७३ (मनोज तिवारी १५१; संदीप शर्मा ३/४९) विजयी वि. उत्तर विभाग : ४७.१ षटकांत सर्वबाद २२१ (गुरकिरात सिंग मान ८३; सौराशिष लाहिरी ३/४१).
सामनावीर : मनोज तिवारी.