माजी विश्वविजेत्या जर्मनीच्या फुटबॉल संघातील आक्रमक मिडफिल्डर मेसूट ओझील याने तडकाफडकी जर्मनीचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला. टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ओझीलवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर वंशवादाचे कारण देत ओझीलने हा निर्णय घेतला होता. मात्र आता या आरोपाला जर्मन फ़ुटबॉल संघटनेने उत्तर दिले आहे.

ओझीलने संघटना किंवा पदाधिकाऱ्यांवर केलेले वंशवादाचे आरोप अमान्य असल्याचे जर्मन फुटबॉल संघटनेने म्हटले आहे. संघटना नेहमीच विविधतेतील एकतेला महत्त्व देत आली आहे. वंशभेद, रंगभेद अथवा कोणत्याही भेदभावाला संघटना कधीही थारा देत नाही, असेही संघटनेने नमूद करण्यात आले आहे. ओझीलच्या संघाबाहेर पडण्याच्या निर्णयाचा आम्हाला खेद आहे. पण त्याचे आरोप तथ्यहीन आहेत, असेही संघटनेने म्हटले आहे.

टर्की देशाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत ओझिलचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. ज्यानंतर त्याला देशाभिमान नाही, अशी टीकाही करण्यात आली होती. तसंच ओझील हा मूळचा टर्कीश वंशाचा असल्यामुळेही जर्मनीच्या फुटबॉल प्रमुख ऑलिव्हर बाइरहॉफ यांनीही त्याच्यावर टीकास्र सोडलं होतं. एदरेगन यांच्यासमवेत झालेल्या भेटीबाबत ओझीलने कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. याचविषयी मौन सोडत यापुढे जर्मनी संघाकडून फुटबॉल खेळणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय ओझीलने घेतला. ‘देशाचा फुटबॉल संघ एखाद्या सामन्यात विजयी ठरतो, तेव्हा मी त्या देशाचा खेळाडू असतो. पण, त्याच संघाची जेव्हा हार होते, तेव्हा मात्र मी निर्वासित होतो’, असे म्हणत ओझीलने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.