Premium

Kapil Dev: “इतक्या अपेक्षा ठेवू नका की…”, विश्वचषक फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवावर कपिल देव यांचे मोठे विधान

Kapil Dev on Team India: विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव पचवणे कोणत्याही भारतीय चाहत्याला सोपे नव्हते. पण आता काळाबरोबर सगळेच त्यातून सावरत आहेत. दरम्यान, कपिल देव यांनीही या स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सूचक वक्तव्य केले आहे.

Don't have so many expectations that your heart gets broken due to too much hype Kapil Dev's big statement on Team India's World Cup campaign
कपिल देव यांनी या स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सूचक वक्तव्य केले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Kapil Dev on Team India: भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या पराभवातून भारतीय चाहते अजूनही सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत आपण क्रिकेटला इतर खेळांप्रमाणेच वागवले पाहिजे आणि जास्त वातावरण निर्मिती करू नये, असे मत माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. यामुळे सर्व भारतीयांचे मन तुटते, असेही पुढे कपिलने म्हटले आहे. १९ नोव्हेंबर रोजी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता पण विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासाठी १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार कपिल देव म्हणाला की, “अतिप्रचार आणि वातावरण निर्मितीमुळे चाहत्यांचे मन तुटते, त्यामुळे माध्यमांनी संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.” तो पुढे म्हणाले की, “भारतीय चाहत्यांनी संघावर इतका दबाव आणू नये आणि क्रिकेटला इतर खेळांप्रमाणे वागवावे.” कपिल देव मंगळवारी म्हणाले, “इतक्या अपेक्षा ठेवू नका की तुमचे मन तुटते. समतोल निर्माण करणे महत्त्वाचे आहे. विश्वचषक खेळण्यासाठी इतर संघही भारतात आले होते. एवढा अतिप्रचार आणि टीम इंडियाच्या बाजूने वातावरण निर्मिती करू नका, खेळाला खेळ मानायला हवे. सामन्याच्या दिवशी जो चांगला खेळतो त्याचा आदर आपण करायला हवा. आम्ही भारतीय खूप भावनिक आहोत.”

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचे मोठे विधान; म्हणाला, “हा वेडेपणा होता…”

कपिल पुढे म्हणाले की, “आजचे खेळाडूच सांगू शकतील की त्यांना किती दडपण आहे. आम्ही फक्त अनुभव घेऊ शकतो. भारत जेव्हा जिंकतो तेव्हा सर्वांना छान वाटतं मात्र, त्यावेळी संघातील काही कमतरतांकडे लक्ष देणे गरजेचे होते. विजयानंतरही उणीवा कायम असून त्या दूर करणे महत्त्वाचे आहे.” माजी कर्णधार म्हणाले, “भारताने सलग दहा सामने जिंकले. हे पुरेसे नाही का? आपण इतर संघांकडेही लक्ष दिले पाहिजे. तुलना करायची गरज नाही. आम्ही चांगले खेळलो की नाही हे पाहिले पाहिजे. आम्ही खूप चांगले खेळलो आणि फक्त फायनलचा दिवस आमचा नव्हता.”

हेही वाचा: Team India: रोहित-विराट टी-२० मध्ये पुनरागमन करणार? पुढील आठवड्यात आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची होणार घोषणा

कपिल देव म्हणाले, “दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडे बघा. इंग्लंड गतविजेता होता पण सातव्या स्थानावर राहिला.” अंतिम सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुमला भेट दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, “पंतप्रधान प्रोत्साहन देणार नाहीत, तर कोण देणार? ते देशातील नंबर वन व्यक्ती असून त्यांचा पाठिंबा मिळाल्याने बरे वाटते.” गेल्या १० वर्षात भारताला ८ पैकी ७ आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

रोहित- विराट टी-२० विश्वचषक खेळणार का?

भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी होती पण रोहित शर्मा अँड कंपनीने ती संधी गमावली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित प्रथमच कर्णधार होता. त्यांना ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघ आता पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळतील का? याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने संपूर्ण संघ बदलला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont have so much hope your heart will break kapil devs big statement on defeat in the final avw

First published on: 29-11-2023 at 12:25 IST
Next Story
IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचे मोठे विधान; म्हणाला, “हा वेडेपणा होता…”