जगभरात पसरलेल्या करोना विषाणुमुळे सध्या भीतीचे वातावरण आहे. क्रीडा विश्वदेखील गेले तीन-चार महिने ठप्प आहे, पण आजपासून मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होणार आहे. इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरूद्ध ८ ते १२ जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना रंगणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेत ICC ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. त्या दृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले आहेत. पण या साऱ्यादरम्यान सामना होण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे. ICC ने एक व्हायरल झालेला फोटो पोस्ट करत याबाबत ट्विट केले आहे.

२०१९च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचा सामना सुरू होता. त्यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूने एक झेल सोडला. त्यानंतर या इसमाने दिलेली ही प्रतिक्रिया व्हायरल झाली होती. अनेक मीम्समध्येही हा फोटो वापरण्यात येतो. पण आता चक्क ICCने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सुमारे चार महिन्यांनंतर पुनरागमन होत आहे. त्या अनुषंगाने अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. पण त्याचसोबत निसर्गाची साथ हादेखील या सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे वाया गेले. त्यामुळे ICCने ८ जुलै (बुधवारचा) हवामानाचा अंदाज पाहिला. त्यात सामन्याच्या काळात बहुतांशी वातावरण ढगाळ आणि पावसाच्या सरी असाच अंदाज दिसला. त्यामुळे ICCने त्या स्क्रीनशॉटसोबतच त्या फॅनचा फोटो शेअर केला आणि कृपा करून या आठवड्यात इंग्लंडने पाऊस येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

Please not this week England!

A post shared by ICC (@icc) on

दरम्यान, कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट असो, करोनाचा धोका संपत नाही तोपर्यंत क्रिकेट सामने बंद दाराआड म्हणजेच विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी स्टेडियममध्ये वाजवण्यात येणार आहेत. प्रेक्षकांविना होणाऱ्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वातावरण निर्मितीसाठी विशेष प्रयोग केले जाणार आहेत. करोनापूर्व काळातील सामन्याप्रमाणेच भासणारे प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी स्पीकरच्या माध्यमातून यावेळी स्टेडियमवर क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी दिमतीला असणार आहेत. रिकाम्या स्टेडियमवर प्रेक्षकांच्या वातावरण निर्मितीसाठी फुटबॉलमध्येही अशा प्रकारचे प्रयोग करण्यात आले होते. काही फुटबॉल लीगच्या सामन्यांना प्रेक्षकांचे फलकही स्टेडियमवर बसवण्यात आले होते.