नवी दिल्ली : हार्दिक पंडय़ाला भारताच्या कसोटी संघात स्थान न देण्याचा राष्ट्रीय निवड समितीचा निर्णय योग्यच आहे. हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करू शकत नसेल, तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघातही स्थान मिळवू शकणार नाही, असे मत माजी निवड समिती सदस्य शरणदीप सिंग यांनी व्यक्त केले आहे.

२०१९मध्ये पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक नियमित गोलंदाजी करीत नाही. ‘‘कसोटी संघातून हार्दिकला वगळण्याचा निर्णय स्वीकारार्ह आहे. एकदिवसीय प्रकारात १० षटके आणि ट्वेन्टी-२० प्रकारात ४ षटके टाकू शकला, तरच त्याचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विचार करावा. फक्त फलंदाज म्हणून तो संघात स्थान मिळवू शकत नाही,’’ असे शरणदीप म्हणाले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसह शरणदीप यांचा निवड समितीचा कार्यकाळ संपला. इंग्लंड दौऱ्यासाठी पृथ्वी शॉ याची राखीव खेळाडू म्हणूनसुद्धा निवड न झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.