भारतीय वेगवान धावपटू हिमा दासची दमदार कामगिरी सुरूच आहे. सलग १५ दिवसांच्या आत हिमाने धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये चौथे सुवर्णपदक जिंकत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर हिमा दास ने हा पराक्रम केला आहे. तसेच पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने आपले दुसरे सुवर्ण पदक मिळवले आहे. हिमा ने केवळ २३.२५ सेकंदात २०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याआधी १९ वर्षांच्या हिमाने २, ६ आणि १४ जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते. हिमा ने स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. Won another gold today in 200m and improved my timings to 23.25s at Tabor GP. pic.twitter.com/mXwQI2W2BI — Hima MON JAI (@HimaDas8) July 17, 2019 दरम्यान, हिमाने आसाममधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने मदतीचा हात पुढे केला आहे. तिने तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. याशिवाय हिमाने इतर नागरिकांना देखील आसाम पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे