शेवटच्या मिनिटातील गाफीलपणा भारताला नेहमीच धोकादायक ठरतो, याचाच प्रत्यय विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आला. बेल्जियमकडून भारताने २-३ अशी हार पत्करली.
अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या या लढतीत पूर्वार्धात बेल्जियमने १-० अशी आघाडी घेतली होती. बेल्जियमकडून फ्लोरेन व्हान अॅब्युल (३४वे मिनिट), सिमोन गॉगनार्ड (५५वे मिनिट) व जॉन डोहमन (७०वे मिनिट) यांनी गोल करीत संघाच्या विजयाला हातभार लावला. भारताकडून मनदीप सिंग (४४वे मिनिट) व आकाशदीप सिंग (५०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
या सामन्यात प्रारंभापासूनच बेल्जियमचा दबदबा होता. त्यांनी सातत्याने काही चांगल्या चाली केल्या. पूर्वार्धात त्यांना तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही. भारताने काही धारदार चाली केल्या. तथापि, त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात ते अपयशी ठरले. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहणार असे वाटत असतानाच बेल्जियमच्या फ्लोरेन याने जोरदार चाल करीत गोल केला व संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात भारताला चांगला सूर गवसला. सामन्याच्या ४४व्या मिनिटाला धरमवीर याने दिलेल्या पासवर मनदीप सिंग याने गोलची संधी साधली व १-१ अशी बरोबरी केली. यामुळे उत्साह वाढलेल्या भारतीय खेळाडूंनी आणखी उत्तम चाली केल्या. ५०व्या मिनिटाला आकाशदीपसिंग याने व्ही.आर.रघुनाथ याच्या पासवर गोल केला व संघाला २-१ अशी आघाडी मिळविली. मात्र आघाडीचा आनंद भारतास फार वेळ टिकविता आला नाही. त्यानंतर पाच मिनिटांनी बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत सिमोन याने सुरेख गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. भारतीय खेळाडूंनी तिसरा गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र त्यांच्या चाली अपयशी ठरल्या. शेवटच्या मिनिटात बेल्जियमने बाजू उलटविली. हा सामना बरोबरीत राहणार अशा संभ्रमात पडलेल्या भारतीय खेळाडूंची शिथिलता बेल्जियमच्या खेळाडूंच्या पथ्यावरच पडली. त्यांच्या खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारली. त्यांची चाल रोखण्यासाठी भारताचा गोलरक्षक श्रीजेश पुढे आला. त्याला चकवत डोहेमन याने चेंडू गोलात ढकलला आणि पुढच्याच सेकंदाला सामना संपल्याची शिट्टी वाजली.