करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र स्पर्धा रद्द झाल्यामुळे बहुतांश सर्व क्रिकेट बोर्डांना आर्थिक नुकसान होणार आहे. हे नुकसान थांबवण्यासाठी आयसीसीने क्रिकेटचा सराव सुरु करण्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुढील काही काळ प्रादूर्भाव टाळण्यासाठी चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करु नये अशी सूचना केली होती. अनेक आजी-माजी गोलंदाजांनी यावर आपलं नकारात्मक मत दर्शवलं आहे. लाळेचा वापर करण्यास मनाई होणार असेल तर आयसीसीने यासाठी काही पर्याय सुचवावा अशीही मागणी काही गोलंदाजांनी केली होती.

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने मात्र आपण लाळ आणि थुंकीशिवाय चेंडू रिव्हर्स स्विंग करु शकतो असं म्हटलं आहे. “होय थोडी समस्या नक्कीच होईल. आम्ही लहानपणापासून चेंडूला थुंकी किंवा लाळ लावून स्विंग करण्याचा सराव करत होतो. परंतू चेंडू जुना झाल्यानंतरही तुम्ही त्याची चकाकी कायम ठेवू शकत असाल तर चेंडू सहज रिव्हर्स स्विंग होईल, मी ते करु शकतो.” शमी इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान बोलत होता. अनिल कुंबळे यांच्या समितीने गोलंदाजांना लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यासाठी मनाई केली असली तरीही घामाचा वापर करायला परवानगी दिली आहे.

परंतू शमीच्या मते घाम आणि लाळ यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो. घामाचा वापर करुन काही गोष्टी बदलतील असं मला वाटत नाही, मी लाळेचा वापर न करता कधीही गोलंदाजी केली नाही. पण सध्याच्या काळात जर करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखायचा असेल तर हे नियम मान्य करणंही तितकच महत्वाचं आहे. रिव्हर्स स्विंग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जाणाऱ्या शमीने आपलं मत मांडलं.