बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने त्याच्या क्रिकेट आदर्शाबद्दल खुलासा केला आहे. शाकिब म्हणतो, की तो फलंदाजीमध्ये राहुल द्रविडला फॉलो करतो. अलीकडेच शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

स्पोर्ट्सकीडाच्या यूट्यूब चॅनेलवर साकिब म्हणाला, ”मी फलंदाजीत राहुल द्रविड आणि सईद अन्वरला फॉलो करतो. गोलंदाजीत, मी हरभजन सिंग आणि सकलेन मुश्ताक यांना फॉलो करतो. बांगलादेश आणि भारताची संस्कृती खूप समान आहे, म्हणून मी भारतीय खाद्य आणि संस्कृतीला प्राधान्य देतो. कोलकातामधील समान भाषा आणि संस्कृतीमुळे, मला ते माझे घर वाटते, मी दूर आहे असे कधीही वाटत नाही.”

यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) संघात शाकिब अल हसनचा समावेश करण्यात आला आहे. यूएई रंगाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. तो फलंदाजी आणि गोलंदाजीत संघाला योगदान देण्यास कितपत उपयुक्त आहे, हे पाहणे बाकी आहे. तो गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरसाठी आयपीएलमध्येही खेळला आहे.

विराट कोहलीबद्दल शाकिब म्हणाला, ”विराट मैदानावर स्पर्धा करण्याची भावना आणि वृत्ती दाखवतो. खेळ संपेपर्यंत तो ती वृत्ती सोडत नाही आणि मला ही गोष्ट आवडते.”

हेही वाचा – ४५० विकेट्स अन् ४५०० धावा; कपिल देवनंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूनं लावला दुसरा नंबर!

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात केकेआर संघाचा पहिला सामना आरसीबीविरुद्ध होईल. त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींमध्ये शाकिबची भूमिका महत्त्वाची असेल. त्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपला दमदार खेळ दाखवला आहे. केकेआर संघ त्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाची आतुरतेने अपेक्षा करेल. केकेआर संघ त्यांच्या नियमित वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सशिवाय स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.