पाकिस्तानपेक्षा भारतातील चाहत्यांकडून अधिक प्रेम मिळते, असे वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर चहूकडून टीकेचा भडिमार झाल्यावर मंगळवारी मात्र त्याने सारवासारव केली. आपल्या देशाला दुय्यम लेखण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता, तर क्रिकेटरसिकांचा आदर करून सकारात्मक संदेश देण्याचा माझा हेतू होता, असे आफ्रिदीने मंगळवारी सांगितले.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर आफ्रिदीचा संदेश उपलब्ध करण्यात आला आहे. पाकिस्तानी चाहत्यांचा अपमान करण्याचा माझा मुळीच हेतू नाही, असे आफ्रिदीने स्पष्ट केले आहे. याबाबत आफ्रिदी म्हणाला, ‘‘मी फक्त पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार नाही, तर सर्व पाकिस्तानी जनतेचे मी प्रतिनिधित्व करीत आहे. त्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ लावू नये. माझी सर्वस्वी ओळख ही पाकिस्तानशी निगडित आहे.’’

रविवारी आफ्रिदीने व्यक्त केलेल्या भारतप्रेमानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी आफ्रिदीवर तोफ डागली होती. आम्हाला तुझी शरम वाटते, अशा शब्दांत त्यांनी त्याची निर्भर्त्सना केली होती. याशिवाय लाहोरमधील एका वकिलाने आफ्रिदीवर कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे.

‘‘मी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रयत्न केला होता. माझ्या वक्तव्यामुळे चाहत्यांची मने दुखावली आहेत, याची मला कल्पना आहे. भारतात खेळणे हे आनंददायी असते, हाच सकारात्मक संदेश मला द्यायचा होता,’’ असे आफ्रिदीने सांगितले.

‘‘वसिम अक्रम, वकार युनूस किंवा इन्झमाम उल हक हे क्रिकेटपटूसुद्धा म्हणतात की, क्रिकेट हा भारतातील धर्म आहे. त्यामुळे या देशात

आम्हाला बराच आदर मिळतो. भारतातील क्रिकेटप्रेमाची महती इम्रान खानसुद्धा सांगतील,’’ असे आफ्रिदीने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘माझ्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणी त्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहात असेल, तर त्याला तो संदेश नकारात्मक वाटेल. माझा हेतू पूर्णत: सकारात्मक होता.’’

दरम्यान मैदानाबाहेरच्या घडामोडी बाजूला सारून पाकिस्तानला बुधवारी बांगलादेशविरूद्ध खेळायचे आहे.

संताप आणि ताप

भारतप्रेमाचे गोडवे गायल्यामुळे देशवासीयांचा संताप ओढवून घेणाऱ्या पाकिस्तानी संघनायक शाहिद आफ्रिदीला तापामुळे मंगळवारी सराव सत्राला दांडी मारावी लागली. याबाबत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस म्हणाले की, ‘‘सकाळी आफ्रिदीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्याने विश्रांती घेणे पसंत केले. वातावरणात उष्णता आणि आद्र्रता जाणवत आहे.’’

युनूस यांच्याकडून पाठराखण

पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी वादग्रस्त विधान करणारा कर्णधार शाहिद आफ्रिदीची पाठराखण केली आहे. आफ्रिदीने कोणतेही वादग्रस्त मत व्यक्त केले नसून, त्याने फक्त आपल्या भावना प्रकट केल्या आहेत, असे युनूस यांनी सांगितले. ‘‘माझे मत विचाराल, तर मला काहीच वादग्रस्त वाटत नाही. त्याला जे वाटते, ते तो म्हणाला. या त्याच्या भावना आहेत. त्यामुळे वाद निर्माण करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करावे.