आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅनडा क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष होवार्ड पेटरूक यांनी जोरदार टीका केली आहे. सहसदस्य राष्ट्रांमध्ये क्रिकेटच्या वाढीची आयसीसीला चिंता नसल्याचे मत पेटरूक यांनी व्यक्त केले आहे.
क्रिकेट हा ऑलिम्किमधील खेळ व्हावा, अशी आयसीसीची अजिबात इच्छा नाही. क्रिकेटला हा दर्जा मिळाला तर सरकारकडून अधिक निधी उपलब्ध होऊ शकेल, असे पेटरूक यांनी सांगितले.
‘‘कॅनडाप्रमाणेच आर्यलड, हॉलंड आणि स्कॉटलंडसारख्या देशांमध्ये मदत करण्यात आयसीसी अपयशी ठरली आहे. हे फक्त मीच म्हणत नसून, प्रत्येक सहसदस्य राष्ट्राचे हेच म्हणणे आहे. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांना पूर्ण सदस्यत्व असले तरी त्यांच्या मताला फारशी किंमत दिली जात नाही,’’ असे पेटरूक यांनी सांगितले.
‘‘पूर्ण सदस्य असलेल्या देशाला दरवर्षी दोन-तीन कोटी अमेरिकन डॉलर्स मिळतात. हेच पैसे आर्यलड किंवा कॅनडाला मिळाले, तर पुढील पाच वर्षांत हे संघ कसोटी खेळणाऱ्या छोटय़ा राष्ट्रांना सहज हरवू शकतील,’’ असे पेटरूक या वेळी म्हणाले.