वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे. २०२१मध्ये रंगणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे ‘आयसीसी’ने बुधवारी जाहीर केले.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या आठवडय़ातच झालेला पहिल्या उपांत्य सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने साखळीतील सलग चार विजयांच्या बळावर उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये दोन दिवसांचे अंतर असूनही राखीव दिवसाची तरतूद न केल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींनी ‘आयसीसी’वर ताशेरे ओढले.

न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या २०२१च्या विश्वचषकातील सामन्यांची रूपरेषा ‘आयसीसी’ने जाहीर केली. ६ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांनीच पात्रता मिळवली असून चार संघांचे स्थान निश्चित होणे बाकीआहे. ३ आणि ४ मार्च रोजी उपांत्य सामने खेळवण्यात येणार असून ७ मार्चला ख्राइस्टचर्च येथे अंतिम लढत खेळली जाईल.