भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अखेरचा साखळी सामना

प्रोव्हिडन्स : वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारत-ऑस्ट्रेलिया ‘ब’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यासाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाणारे हेच दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने या लढतीकडे अंतिम सामन्याची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले जात आहे.

दोन्ही संघांनी साखळीतील पहिले तीनही सामने जिंकून दिमाखात उपांत्य फेरी गाठली असल्यामुळे या सामन्यात अनेक संघबदल पाहायला मिळू शकतात. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंड आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांना सहज धूळ चारली. मात्र तिसऱ्या सामन्यात आर्यलडने भारताला कडवी झुंज दिली. अखेरीस फिरकीपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने आर्यलडवर ५२ धावांनी मात केली.

हरमनप्रीतशिवाय युवा जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना व मागील लढतीत अर्धशतक झळकावणारी अनुभवी मिताली राज यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार आहे, तर गोलंदाजीत पूनम यादव व दयानंद हेमलता यांची जोडी कमाल करत आहे. दोघींनी तीन सामन्यांत मिळून ११ बळी मिळवले आहेत. त्याशिवाय राधा यादव व दीप्ती शर्मा यांनीसुद्धा गेल्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केल्याने भारत शनिवारी होणाऱ्या सामन्यातदेखील फक्त एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे न्यूझीलंड, आर्यलड व पाकिस्तान संघांना सहज पराभूत करत ‘ब’ गटातून सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली. अनुभवी कर्णधार मेग लॅनिंग, अष्टपैलू एलिस पेरी व मागील आठ ट्वेन्टी-२० सामन्यांत सहा वेळा अर्धशतकाचा टप्पा ओलांडणारी एलिसा हीली यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत वाटते. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत ‘अ’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी झुंजणार आहे.

’ सामन्याची वेळ : रात्री ८.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १