कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने अॅडलेड कसोटीत चहापानाच्या सत्रापर्यंत ३ बाद १०७ अशी मजल मारली आहे. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या दोन्ही सलामीवीरांनी निराशाजनक खेळी केल्यानंतर कोहली आणि पुजारा यांनी आपला अनुभव पणाला लावत कांगारुंचा नेटाने सामना केला. दोन्ही फलंदाजांनी जास्त जोखीम न घेता धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली.

पहिल्या सत्राअखेरीस २ बाद ४१ अशी परिस्थिती झालेल्या भारतीय संघाला विराट आणि पुजाराच्या अर्धशतकी भागीदारीमुळे आधार मिळाला. पुजाराने आपल्या नेहमीच्या शैलीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडलं. विराट कोहलीनेही एक बाजू नेटाने लावून धरत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या खराब चेंडूवर फटकेबाजी करायला सुरुवात केली. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असताना नेथन लियॉनने पुजाराला आपल्या जाळ्यात अकडवलं.

१६० चेंडूंचा सामना करत २ चौकार लगावत पुजाराने ४३ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराला बाद करण्याची लियॉनची ही १० वी वेळ ठरली. पुजारा माघारी परतल्यानंतर विराट आणि अजिंक्यने उरलेली षटकं खेळून काढत संघाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. चहापानाअखेरीस भारताने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला असून अखेरचं सत्र भारतीय फलंदाज कसं खेळून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.