तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकून इतिहास रचला आहे. अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांची झुंज मोडून काढत भारताने सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात झळकावलेलं शतक आणि दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेसोबत केलेली भागीदारी यामुळे भारताचं पारडं या सामन्यात नेहमी वर राहिलं. कर्णधार विराट कोहलीनेही सामना संपल्यानंतर आपल्या संपूर्ण संघाने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. अॅडलेड कसोटीतला हा विजय आमच्यासाठी खासच आहे, मात्र एका विजयाने आता टीम इंडिया समाधानी होणार नाही असं म्हणत विराटने ऑस्ट्रेलियाला सूचक इशारा दिला आहे.

“अॅडलेड कसोटी विजयाचा आम्हाला आनंद आहेच, मात्र आम्ही इथेच थांबणार नाही. विजयाची ही मोहीम पुढील सामन्यांमध्येही आम्हाला सुरु ठेवायची आहे. या विजयामुळे संपूर्ण संघाला एक आत्मविश्वास मिळाला आहे. याचा आगामी सामन्यांमध्ये आम्हाला नक्कीच फायदा होईल.” विराट सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी विराटने आपल्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचंही कौतुक केलं. पहिल्या दिवसानंतर खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसताना २० बळी घेणं ही सोपी गोष्ट नसल्याचं विराटने सांगितलं. यापुढचा सामना १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानात खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : उस्मान ख्वाजा नंतर पॅट कमिन्स; ऋषभ पंतचं यष्टींमागून स्लेजिंग सुरुच