न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत ३४७ धावांचा डोंगर उभा केला. श्रेयस अय्यरने शतक झळकावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. १०७ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अय्यरने १०३ धावा केल्या. त्याला लोकेश राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. लोकेश राहुलने नाबाद ८८ तर विराट कोहलीने ५१ धावा केल्या. विराट कोहलीने अर्धशतकी खेळीदरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.

कर्णधार या नात्याने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याने गांगुलीचा ५ हजार ८२ धावांचा विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करणारे भारतीय –

  • महेंद्रसिंह धोनी – ६ हजार ६४१ धावा (१७२ डाव)
  • मोहम्मद अझरुद्दीन – ५ हजार २३९ धावा (१६२ डाव)
  • विराट कोहली – ५ हजार १२३ धावा (८३ डाव)
  • सौरव गांगुली – ५ हजार ८२ धावा (१४२ डाव)

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र भारतीय सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विराट कोहली इश सोधीच्या गोलंदाजीवर ५१ धावा काढून माघारी परतला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पहिल्याच वन-डे सामन्यात विराटची सचिनशी बरोबरी