कॅनबेरा : भारताने तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गुरुवारी ऑस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखले.

शोनेल कोर्टनीने २५व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मग ५२व्या मिनिटाला गगनदीप कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला बरोबरी साधून दिली.

भारताने पहिल्या सत्रात आक्रमक प्रारंभ केला. १०व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर वाया घालवला. दुसऱ्या सत्रात भारताचा बचाव भेदून शोनेलने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नरद्वारे आघाडी वाढवण्याची उत्तम संधी चालून आली. परंतु भारताच्या बचाव फळीपुढे ते अपयशी ठरले. चौथ्या सत्रात मात्र भारताच्या गगनदीपने गोल साधताना कोणतीही चूक केली नाही.