* जर्मनीचा भारतावर ३-२ असा विजय
* चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा

सलग दोन विजयानंतर अखेरच्या साखळी सामन्यात भारताला जर्मनीने अटीतटीच्या लढतीत ३-२ असे पराभूत केले, तरीही ‘अ’ गटामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. साखळी फेरीनंतर भारत आणि जर्मनी यांचे समान सहा गुण असले तरी गोल फरकांच्या जोरावर भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे. गोल फरकांमध्ये भारताचे ३ गुण असून जर्मनीच्या खात्यात १ गुण आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना ‘ब’ गटात तळाला असलेल्या बेल्जियमशी होणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. सहाव्या मिनिटाला गुरविंदर सिंगने गोल लगावत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण १४ व्या मिनिटालाच जर्मनीच्या ओलव्हिर कॉर्नने गोल लगावल्याने जर्मनीला भारताशी १-१ अशी बरोबरी करता आली. सामन्याच्या ४६ व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण लगावत गोल केला आणि सामन्यात पुन्हा एकदा आघाडी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही सुरुवातीला काही वेळ वर्चस्व राखले, पण जर्मनीचा बचाव भेदण्यात मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी भारतीय संघ स्पर्धेतील विजयाची हॅट्ट्रिक साजरी करेल असे वाटले होते, पण जर्मनीच्या टोबिआस मटानियाने भारताला विजयापासून परावृत्त करत संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला टोबिआसने गोल लगावत भारताशी बरोबरी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार आक्रमण लगावत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना जर्मनीशी बरोबरी करण्याची भारताला संधी चालून आली होती, पण पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.