खेळाडू बदलला की संघाच्या नशिबाचे फासेही बदलतात, याचाच प्रत्यत भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आला. कसोटी मालिकेच्या पराभवाने पिचलेल्या आणि वाद-विवादांनी विटलेल्या भारतीय संघात सुरेश रैनाच्या सुरेख शतकाने चैतन्य संचारले व विजयाचा अंकुर फुटला.  रैनाचे दमदार शतक आणि रोहित शर्मा व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ३०४ धावा फटकावल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडपुढे ४७ षटकांमध्ये २९५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. गोलंदाजांच्या अचुक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ १६१ धावांमध्ये संपुष्टात आला आणि भारताने डकवर्थ-लुइस नियमांनुसार १३३ धावांनी विजय मिळवला. तडफदार शतक झळकावणाऱ्या रैनाला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि पुन्हा एकदा भारताला सुरुवातीलाच दुहेरी धक्के बसले. शिखर धवन (१२) आणि विराट कोहली हे पुन्हा एकदा अपयशी ठरले, कोहलीला तर या वेळी भोपळाही फोडता आला नाही. २ बाद १९ अशी अवस्था असताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे (४१) या दोन्ही मुंबईकरांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. रोहितने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. रहाणे आणि रोहित हे दोघेही स्थिरस्थावर झालेले फलंदाज ठरावीक फरकाच्या अंतराने माघारी परतल्याने इंग्लंड भारताला झटपट गुंडाळण्याचे स्वप्न पाहात होता, पण रैनाने तडफदार शतक झळकावत इंग्लंडच्या स्वप्नांचा चुराडा केला. धोनीच्या साथीने खेळताना रैनाने भारताच्या धावसंख्येला सुरेख आकार दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचली. रैनाने ७५ चेंडूंमध्ये एक डझन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारली. धोनीने ६ चौकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याच्या नादात या दोघांनीही आपल्या विकेट गमावल्या.
२९५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ठराविक फरकानंतर इंग्लंडने फलंदाज गमावल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. वोक्स गो. ट्रेडवेल ५२, शिखर धवन झे. बटलर गो. वोक्स ११, विराट कोहली झे. कुक गो. वोक्स ०, अजिंक्य रहाणे यष्टिचीत बटलर गो. ट्रेडवेल ४१, सुरेश रैना झे. अॅण्डरसन गो. वोक्स १००, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. वोक्स ५२, रवींद्र  जडेजा नाबाद ९, आर. अश्विन नाबाद १०, अवांतर (बाइज १, लेग बाइज ११, वाइड १६, नो बॉल १) २९, एकूण ५० षटकांत ६ बाद ३०४.
बाद क्रम : १-१९, २-१९, ३-११०, ४-१३२, ५-२७६, ६-२८८.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १०-१-५७-०, ख्रिस वोक्स १०-१-५२-४, ख्रिस जॉर्डन १०-०-७३-०, बेन स्टोक्स ७-०-५४-०, जो रूट ३-०-१४-०, जेम्स ट्रेडवेल १०-१-४२-२.
इंग्लंड (४७ षटकांमध्ये २९५ धावांचे आव्हान) : अॅलिस्टर कुक पायचीत गो. शमी १०, अॅलेक्स हेल्स झे. अश्विन गो. जडेजा ४०, इयान बेल त्रि. गो. मोहम्मद शमी १, जो रूट त्रि. गो. कुमार ४, इऑन मॉर्गन झे. शमी गो. अश्विन २८, जोस बटलर झे. कोहली गो. जडेजा २, बेन स्टोक्स झे. रहाणे गो. जडेजा २३, ख्रिस वोक्स यष्टीचीत धोनी गो. जडेजा २०, ख्रिस जॉर्डन पायचीत गो. रैना ०, जेम्स ट्रेडवेल झे. जडेजा गो. अश्विन १०, जेम्स अँडरसन नाबाद ९, अवांतर (लेग बाइज ३, वाइड २) ५, एकूण ३८.१ षटकांत सर्व बाद १६१.
बाद क्रम : १-४५, २-५६, ३-६३, ४-८१, ५-८५, ६-११९, ७-१२६, ८-१२८, ९-१४३, १०-१६१.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-३०-१, मोहित शर्मा ६-१-१८-०, मोहम्मद शमी ६-०-३२-२, आर. अश्विन ९.१-०-३८-२, रवींद्र जडेजा ७-०-२८-०, सुरेश रैना ३-०-१२-१.
सामनावीर : सुरेश रैना.