भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंमधील स्लेजिंग काही केल्या थांबत नाहीय. रांची कसोटीतील स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहलीचे स्लेजिंगचे प्रकरण ताजे असतानाच धरमशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने पुन्हा एका स्लेजिंगला खतपाणी घातलं. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा धरमशाला कसोटीच्या तिसऱया दिवशी मैदानात ठाण मांडून उभा असताना त्याची एकाग्रत भंग करण्यासाठी मॅथ्यू वेडने स्लेजिंजचा वापर करून त्याला बाद करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण जडेजानेही मॅथ्यू वेडला जशास तसे प्रत्युत्तर देखील दिले.

जडेजा आणि साहा यांनी मैदानात जम बसवला असल्याने गोलंदाजीतून ही जोडी फोडण्यात अपयश येत असल्याने यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने जडेजाला डिवचण्यास सुरूवात केली. तू भारतीय संघात नेमका कशासाठी आलास? असा खोचक टोला लगावून वेडने जडेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यू वेड यष्टीच्या मागून जडेजाला इतका बोलू लागला की त्याला फलंदाजी करण्यासही कठीण जात होते. अखेर जडेजानेही आपल्या सहनक्षमता संपल्यानंतर मॅथ्यू वेडला एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिले.

”तू जर सुरूवात केलीस(स्लेजिंग)..तर त्याचा शेवट मी करेन” असे जडेजाला वेडला म्हणाला. पंचांनाही दोघांमध्ये सुरू असलेला प्रकार लक्षात आला आणि त्यांनीही दोन्ही खेळाडूंना हे प्रकरण इथेच थांबविण्याची ताकिद दिली. पंचांच्या सुचनेनंतरही मॅथ्यू वेड जडेजाला त्रास देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. षटक संपल्यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही याबाबतची माहिती दिली. त्याही वेळेस दोघांमध्ये खटके उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला बळी न पडता जडाजाने मोठ्या संयमाने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे जल्लोषात सेलिब्रेशन देखील केले.