सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतर अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला ६ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिका २-० अशी खिशात घातली.  भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीर कॉलिन मुन्रो (७५) आणि कर्णधार केन विल्यमसन (६४) धावांच्या दमदार खेळीनंतर लॅथमने न्यूझीलंडच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, सामना रंगतदार स्थितीत असताना बुमराहाच्या गोलंदाजीवर तोधावबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडला निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३१ धावांपर्यंत मजल मारता आली. मालिकेतील विजयाने भारताने सलग सात द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या जोरावर भारताने पाहुण्या न्यूझीलंडसमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्ण घेतला. त्यानंतर सातव्या षटकात शिखर धवनला बाद करत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मा (१४७) आणि विराट कोहली (११३) यांना रोखण्यात न्यूझीलंड गोलंदाज अपयशी ठरले. परिणामी निर्धारित ५० षटकात भारताने ६ बाद ३३७ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या ४२ व्या षटकात १४७ धावावर खेळत असलेल्या रोहित शर्माला मिचेल सँटनरने बाद केले. त्यानंतर सँटनरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात पांड्या अवघ्या ८ धावांवर बाद झाला. साऊदीने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवत चौथा धक्का दिला. न्यूझीलंड गोलंदाज अखेरच्या षटकात भारताला लागोपाठ धक्के देत असताना महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर धोनीही बाद झाला. त्याने १७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. केदार जाधवने १० चेंडूत १८ तर दिनेश कार्तिकने ३ चेंडूत नाबाद ४ धावा केल्या.