सलामीच्या सामन्यात ओमानवर ११-० असा दणदणीत विजय

आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्याने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला स्थान निश्चित करता आले नाही. मात्र आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताला गतविजेतेपद कायम राखण्यासाठी झुंजावे लागणार आहे. सलामीच्या सामन्यात ओमानचा ११-० असा धुव्वा उडवल्यानंतर शनिवारी रात्री भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या महालढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, युवा आघाडीवीर दिलप्रीत सिंग याने झळकावलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने यजमान ओमानवर ११-० असा दणदणीत विजय मिळवत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने दमदार सुरुवात केली.

पहिल्या सत्रात ओमानने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत भारताचे आक्रमक हल्ले परतवून लावले होते. पण १७व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करत भारताचे खाते खोलले. त्यानंतर भारताने गोलधडाका सुरू केला. दुसऱ्या सत्रात भारताने आणखीन चार गोल लगावले. हरमनप्रीतने २२व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर निलकंठ शर्मा याने पुढच्या मिनिटाला आणखीन एक गोल लगावला. आकाशदीप सिंगने २७व्या तर मनदीप सिंगने ३०व्या मिनिटाला गोल झळकावत भारताची आघाडी ५-० अशी वाढवली.

गुरजंत सिंगने ३७व्या मिनिटाला गोल केल्यानंतर दिलप्रीत सिंगने ४१व्या, ५५व्या आणि ५७व्या मिनिटाला हॅटट्रिक साजरी केली. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. वरुण कुमार (४९व्या मिनिटाला) आणि चिंगलेनसाना सिंग (५३व्या मिनिटाला) यांनीही भारताच्या विजयात योगदान दिले.

वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून खेळताना पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या दिलप्रीतने आपल्या कामगिरीचे श्रेय संघसहकाऱ्यांना दिले आहे. तो म्हणाला, ‘‘माझ्या वैयक्तिक कामगिरीमुळे हे शक्य झाले नाही. माझ्या सहकाऱ्यांनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्यामुळेच मला गोल लगावता आले.’’

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने सुरुवात -हरेंद्र

जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी विसरून आम्ही आता आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी सज्ज झालो आहोत. आमच्या अभियानाची खरी सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होईल, असे भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सांगितले.

‘‘आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने पुढचे काही दिवस खेळाडू निराशेच्या गर्तेत होते. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकजिंकू शकलो नाही, याची खंत आजही खेळाडूंच्या मनात आहे. पण आता आम्ही मागचा विचार करणार नाही. आता आम्ही या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असून पुढील महिन्यात भुवनेश्वर येथे रंगणाऱ्या हॉकी विश्वचषकाची तयारी म्हणून आम्ही या स्पर्धेकडे पाहत आहोत,’’ असेही हरेंद्र सिंग यांनी सांगितले.

  • सामन्याची वेळ : रात्री १०.४० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २