सचिन तेंडुलकरशिवाय प्रथमच कसोटी क्रिकेटच्या रणांगणावर उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच दिवशी विराट कोहलीच्या रूपाने चौथ्या स्थानाला न्याय देऊ शकणारा फलंदाज गवसला आहे. ‘विराट आमुची ध्येयासक्ती’ असा दुर्दम्य आत्मविश्वास जोपासत कोहलीने भारताचा डाव सावरणारे शानदार शतक झळकावले. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ५ बाद २५५ अशी समाधानकारक मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील एकमेव सराव सामनासुद्धा पावसामुळे वाटय़ाला न येऊ शकणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने यजमानांच्या वेगवान माऱ्याचा मुकाबला केला. खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी अनुक्रमे ४३ आणि १७ धावांवर खेळत होते.
कोहलीने २५७ मिनिटे आणि १८१ चेंडू खेळपट्टीवर टिकाव धरत १८ चौकारांच्या साहाय्याने आपली ११९ धावांची शतकी खेळी साकारली. डय़ुमिनीच्या ६३व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार ठोकून कोहली ९८वर पोहोचला. मग सहाव्या चेंडूवर मिडविकेटला दोन धावा काढून कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक कोहलीने पूर्ण केले आणि आपला आनंद साजरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शतक झळकावणारा कोहली आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे. जॅक कॅलिसने कोहलीला बाद केले. त्याने रहाणेसोबत पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला. डेल स्टेन आणि नव्या चेंडूवर त्याला साथ देणारा व्हर्नन फिलँडर यांनी आऊटस्विंगर्सचा मारा करून भारताच्या आघाडीच्या फळीला त्रस्त केले. स्टेनने नवव्या षटकात शिखर धवनचा अडसर दूर केला. फाइन लेगला इम्रान ताहिरने त्याचा सुरेख झेल टिपला. मुरली विजय एक तास नऊ मिनिटे खेळपट्टीवर तग धरून होता. परंतु ४२ चेंडूंत फक्त ६ धावा काढून तो माघारी परतला. मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ए बी डी व्हिलियर्सने त्याचा झेल घेतला.
मग २ बाद २४ अशा केविलवाण्या अवस्थेनंतर चेतेश्वर पुजाराच्या साथीला दिल्लीचा गुणवान फलंदाज विराट कोहली आला. त्याने चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करीत भारतीय डावाला स्थर्य मिळवून दिले. कोहली-पुजारा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. परंतु चेतेश्वर पुजारा दुर्दैवीरीत्या धावचीत झाला. त्याने २५ धावा केल्या.
रोहित शर्माला खेळपट्टीवर ठामपणे उभे राहण्यात अडचणी आल्या. फिलँडरच्या उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात डी व्हिलियर्सकडे झेल देऊन तो तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीपुढे कोहली वगळता अन्य भारतीय फलंदाज आत्मविश्वासाने सामोरे गेले नाहीत. परंतु फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर आणि जे पी डय़ुमिनी यांच्या गोलंदाजीवर त्यांनी आरामात धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून स्टेन, फिलँडर, कॅलिस आणि मॉर्केल यांनी प्रत्येकी बळी घेतले.

धावफलक
भारत (पहिला डाव) :
मुरली विजय झे. डी व्हिलियर्स गो. मॉर्केल ६, शिखर धवन झे. ताहीर गो. स्टेन १३, चेतेश्वर पुजारा धावचीत २५, विराट कोहली झे. डय़ुमिनी गो. कॅलिस ११९, रोहित शर्मा झे. डी व्हिलियर्स गो. फिलँडर १४, अजिंक्य रहाणे खेळत आहे ४३, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे १७, अवांतर (लेगबाइज ३, वाइड १४, नोबॉल १) १८, एकूण ९० षटकांत ५ बाद २५५
बाद क्रम : १-१७, २-२४, ३-११३, ४-१५१, ५-२१९
गोलंदाजी : डेल स्टेन २३-५-५६-१, व्हर्नन फिलँडर २१-२-५५-१, मॉर्नी मॉर्केल १९-१०-२७-१, जॅक कॅलिस १४-४-३७-१, इम्रान ताहिर ८-०-४७-०, जे पी डय़ुमिनी ५-०-३०-०