विशाखापट्टणम : अजिंक्य रहाणेचे आणि १७ या आकडय़ाचे ऋणानुबंधाचे नाते असावे, कारण १७ कसोटी सामन्यांच्या अंतराने त्याला शतक साकारण्यात यश आले.

भारताचा कसोटी उपकर्णधार रहाणेवर वेस्ट इंडिजमध्ये कामगिरी करण्यासाठी प्रचंड दडपण होते; परंतु अँटिग्वाच्या पहिल्या कसोटीत त्याने ८१ आणि १०२ धावा काढत शतक साकारले.

‘‘प्रत्येक सामना आणि मालिकेतून आपण शिकत असतो; परंतु मला दोन वर्षे आणि १७ सामने कसोटी पदार्पणाची वाट पाहण्यात गेले. मग या शतकासाठी मी १७ कसोटी सामने प्रतीक्षा केली,’’ असे रहाणेने सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे.

‘‘जेव्हा मी हॅम्पशायरकडून खेळत होतो, तेव्हा माझे कसोटी पदार्पण केव्हा होणार, ही चिंता मला भेडसावत होती. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर माझी विचारप्रक्रिया खात्यावर एकही शतक नसणाऱ्या फलंदाजाप्रमाणे झाली होती. जे काही घडायचे होते, ते घडून गेले आहे. जर शतक व्हायचेच असेल, तर ते होईल,’’ असे रहाणेने सांगितले.

धावा होण्यासाठी तंत्रात बदल केला नसल्याचे रहाणेने स्पष्ट केले. याबाबत तो म्हणाला, ‘‘या कठीण काळात माझा स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. तांत्रिक मुद्दय़ांपेक्षा कठीण परिस्थिती मानसिकदृष्टय़ा कशी हाताळली जाते, हे महत्त्वाचे असते.’’

‘‘कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग म्हणून भारताला मायदेशात पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी तीन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दोन बांगलादेशविरुद्ध आहेत. तुम्ही कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. गुण पद्धती अस्तित्वात असल्याने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे,’’ असे रहाणेने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेला कमी लेखून चालणार नाही!

दक्षिण आफ्रिकेच्या संघात एबी डी’व्हिलियर्स आणि डेल स्टेन यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश नाही; परंतु तरीही त्यांना कमी लेखून चालणार नाही, असे मत रहाणेने व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी भारतात झालेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला ०-३ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. ‘‘एडीन मार्करम आणि टेम्बा बव्हुमा यांनी सराव सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. फॅफ डय़ू प्लेसिस अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून उत्तम प्रतिकार होऊ शकेल,’’ असे रहाणेने सांगितले.