वेस्ट इंडिज दौऱयातील चौथा कसोटी सामना अखेर पावसामुळे पाण्यात गेला. पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सलग चार दिवसांच्या पावसामुळे अनिर्णीत म्हणून घोषित करावी लागली. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशा आघाडीने मालिका खिशात टाकली. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ २२ षटकांचाच खेळ होऊ शकला होता. त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे या कसोटीत एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही व कसोटी अनिर्णीत म्हणून घोषीत करण्यात आली.
चार कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना भारताने १ डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता, तर दुसरा सामना अनिर्णीत राहिला. तिसऱया सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २३८ धावांनी वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर चौथा कसोटी सामना देखील खिशाट टाकून वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने भारतीय संघ पूर्णपणे सज्ज होता. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज स्वस्तात माघारी देखील परतले होते, पण वरुणराजाच्या आगमनामुळे सामन्यावर पाणी फेरले.