मुंबई मास्टर्स संघाची लाल जर्सी, करडय़ा रंगाची ट्राऊजर आणि लाल रंगाचे शूज. अत्यंत काटक शरीर, अनोखी केशरचना आणि समोरच्या माणसाचा वेध घेणारे भेदक डोळे.. बॅडमिंटनविश्व गाजवणाऱ्या या सवरेत्कृष्ट बॅडमिंटनपटूचे हे पहिले दर्शन.. ली चोंग वेई हे नाव फार परिचयाचे नाही.. मात्र क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या क्रिकेटपटूला जी प्रतिष्ठा असते किंवा टेनिसमध्ये क्रमवारीत अव्वल असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांचा जसा प्रचंड चाहचावर्ग आहे, त्याच मांदियाळीत लीचा समावेश होतो.. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत मलेशियाचा ली चोंग वेई तब्बल १९९ आठवडे अढळस्थानी आहे.. २००८ आणि २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या ली चोंग वेईने सातत्यपूर्ण खेळ, अफाट ऊर्जा, जबरदस्त तंदुरुस्तीच्या जोरावर हे स्थान टिकवले आहे.. एरव्ही टीव्ही किंवा ‘यू-टय़ूब’च्या माध्यमातून या अव्वल बॅडमिंटनपटूचा खेळ पाहण्याची संधी बॅडमिंटनप्रेमींना मिळते. मात्र इंडियन बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने ली भारतात अवतरला आहे. गुवांगझाऊ येथे नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील चुरशीच्या लढतीत लीच्या स्नायूंना दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली. आयबीएलमधील सगळ्यात महागडा खेळाडू असलेला ली खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र रविवारी दुपारी लीचे मुंबईत आगमन झाले आणि साऱ्या शंका दूर झाल्या.
मुंबई मास्टर्स संघाच्या सराव सत्रानंतर लीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘‘आयबीएल स्पर्धेत खेळण्यासाठी मी आतूर आहे. स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलो असून आगामी मुंबईला जिंकून देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेन. चीनच्या लीगमध्ये मी याआधी खेळलो आहे. त्यामुळे या प्रकारात खेळताना अडचण येणार नाही. ११ गुणांचा तिसरा गेम आव्हानात्मक असेल,’’ असे ली याने सांगितले. मात्र विश्व अजिंक्यपद स्पर्धा आणि लिन डॅनविरुद्ध वारंवार होणारा पराभव याविषयी बोलण्याचे ली याने टाळले.